सांगली : मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. खासदार राजू शेट्टी, तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडून येऊन दाखवा, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. मला आमदारपद, मंत्रिपद भाजपच्या कोट्यातून मिळाले असल्यामुळे, शेट्टींनी काढण्याचा संबंधच कुठे येतो? मला काढायचे की ठेवायचे ते भाजपचे नेतेच ठरवतील, असा टोलाही त्यांनी शेट्टींना लगावला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर खोत यांना राज्य मंत्रिमंडळातून काढण्याबाबत खा. शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर खोत यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.
शेट्टींनी संघटनेच्या हितापेक्षा स्वहित जपले!
सदाभाऊ खोत म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता होतो आणि सरकारमध्ये गेल्यानंतरही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो. मंत्री झाल्यानंतरही माझ्या छातीवरचा संघटनेचा बिल्ला मी काढला नव्हता. पण, माझे मंत्रिपद शेट्टींच्या डोळ्यात खुपत असल्यामुळे त्यांनी वारंवार माझ्यावर टीका करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाचाही जिल्हा परिषद निवडणुकीत जाणीवपूर्वक पराभव केला. तरीही मी संघटनेचे काम प्रामाणिकपणे करत होतो. मात्र त्यांनी चौकशी समिती नेमण्याचे नाटक करून माझी हकालपट्टी केली. एवढ्यावर समाधान झाले नसल्यामुळे माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत टीका करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. शेट्टींनी शेतकरी हितापेक्षा स्वत:च्या हितालाच नेहमी प्राधान्य दिले. त्याचा आणि इतर भानगडींचा मी साक्षीदार आहे. ऊसदराबाबत कारखानदारांच्या बैठकीत बोलायचे एक आणि शेतकर्यांसमोर दुसरेच सांगायचे. आम्हालाही त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटायचे, असेही खोत म्हणाले.
खा. शेट्टींचा राजकारणाचा व्यवसाय बंद पाडू
खा. राजू शेट्टींनी शेतकर्यांचे भांडवल करून राजकारणाचा ‘व्यवसाय’ चालू केला आहे. याला माझा विरोध होता, म्हणूनच त्यांनी माझी संघटनेतून हकालपट्टी केली आहे. पण, यापुढे त्यांचा राजकारणातील आणि संघटनेतील साखरसम्राटांबरोबरचा ‘व्यवसाय’ बंद पाडण्यात येईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. शेतकरी संघटनेतून शरद जोशींनी तुमची हकालपट्टी केली, तेव्हा तुम्ही गद्दारी केली होती का? जोशींनी भाजपबरोबर युती केली म्हणून त्यांच्यावर टीका करून तुम्ही स्वतंत्र संघटना स्थापन केली. त्यावेळी तुमचा आत्मसन्मान कोठे गेला होता? कोल्हापुरात भाजपबरोबर, सांगलीत काँग्रेस आणि नाशिक, पनवेलमध्ये शिवसेनेबरोबर युती-आघाड्या करता आणि तत्त्वाची भाषा आम्हाला शिकविता काय, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केला.
तर स्वाभिमानीला आणखी एक मंत्रिपद!
कोल्हापूर : सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एनडीएमध्येच राहण्याचा निर्णय घेतला तर राज्यात त्यांना आणखी एक मंत्रिपद देऊ. याबाबत सध्या विचार सुरु असल्याचे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दाभाऊंबाबत ते म्हणाले, सदाभाऊ खोत यांचे काम चांगले आहे. ते सध्या मुख्यमंत्री कोट्यातून मंत्री आहेत. तसेच जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एनडीएमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना राज्यात आणखीन एक मंत्रिपद देण्याबाबत विचार सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच आहे.