योग केल्याने पोट भरत नाही, आरोग्य चांगले राहते. आणि चांगल्या आरोग्यासाठी अन्न महत्वचाचे असते. ते अन्न आपला शेतकरी पिकवतो. त्यामुळे शारिरीक आरोग्य चांगले हवे असेल तर देशातील कृषी आरोग्यदेखील चांगले राहणे तेवढेच गरजे आहे.
गलेलठ्ठ पगारावर नोकर्या करणारे, एसीमध्ये तासनतास एकाच खुर्चीवर बसणारे तसेच उद्योग व्यवसाय करणारे उद्योगपती, व्यापारी, थोडक्यात अमितभाईंच्या भाषेत बनियांना योगाची नितांत गरज असते. कारण ते फक्त पैसे मोजत असतात. त्यांच्या शरिराला बिलकूल व्यायाम मिळत नाही. अशा लोकांना योगाची नितांत गरज असते. अन्यथा पोट सुटणे, रक्तदाब वाढणे, मधुमेह असे आजारही शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे अशा लोकांना सतत आजारपणाची चिंता सतावत असते. म्हणनूच ते योग करण्याकडे वळतात.
तर युवावर्ग आपल्या संस्कृतिमधील योगाचे आकर्षण असल्याने त्याकडे वळतो. त्याला उत्तम शरिरयष्टी हवी असते. आरोग्य हवे असते. युवावर्गाचे योग करण्याचे आकर्षण आपण समजू शकतो. पण वरिलप्रकारातील योगप्रेमी हे आरोग्याच्या भितीपोटी उशीरा जाग आल्याने योगाकडे वळलेले असतात. चतुर बनियाच असतात ते. सर सलातम तो पगडी पचास, असं ब्रीद वाक्यच असते त्यांचे. परंतू आज देशात सर्वात मोठी समस्या आ वासून उभी आहे; ती म्हणजे शेतकरी आत्महत्या. या गंभीर समस्येकडे आपले राज्यकर्ते ढूंकुन पाहण्यास तयार नाहीत.
संपुर्ण जगात जेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करोडो लोक योग करत असताना मध्यप्रदेशातील मिर्जापुर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर शेकडो शेतकर्यांनी एकत्र येत शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्या केंद्र सरकारचा निषेध केला. हा निषेध सुध्दा योग दिनाला साजेसा होता. हजारो शेतकर्यांनी महामार्गावर शवासन केले आणि आपला संताप व्यक्त केला. एक तासभर या महामार्गावरील वाहतूक शेतकर्यांनी रोखून धरली होती. पोलिस पोहोचल्यानंतरही दोन तासानंतर शेतकरी महार्गावरून बाजूला झाले. मध्य प्रदेशात हे वातावरण असताना आपल्या महाराष्ट्रात सुध्दा शेतकर्यांसमोर दहा हजारांचा तुकडा टाकून बोळवण करण्यात आली आहे. पहिले दहा दिवस तर ते दहा हजार रूपयांचे कर्जसुध्दा जाचक अटीमुळे शेतकर्यांना मिळू शकले नाही. या कर्जाच्या निकषांमध्ये काही बदल केल्यानंतर आता ते दहा हजार मिळू शकतील अशी आशा आहे. अशा प्रकारे अन्न पिकवणार्या शेतकर्यांना जर देशात बुरे दिन आले असतील तर योग दिन काय कामाचा? तो तर चतुर बनियांसाठीच उपयुक्त ठरू शकतो. त्यांनाच त्याची मोठी गरज आहे. कारण शेतात राबणारा शेतकरी, शेतमजुर आणि छोट्यामोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारा कामगार कष्टाचे काम करत असल्याने त्याचे शरिर आपोआपच निरोगी आणि पिळदार झालेले असते. त्याला योग करण्याची गरजच भासत नाही.
ज्या देशातील शेतकरी अस्वस्थ असेल तिथे योगा करून काय मिळणार. जो सर्वांचे पोट भरतो तो शेतकरीच आज आत्महत्या करू लागला आहे. उद्या अन्नधान्य पिकवणारा हा वर्गच खचला तर तुम्हीआम्ही काय खाणार? रिकाम्यापेटीच योग करणार का? पोटात अन्नाचा कण नसताना योग करता येईल का? म्हणूनच या देशातील शेतकरी अगोदर सुखी झाला पाहिजे. योगपेक्षाही शेतकर्याला आपल्या भारतीय संस्कृतिमध्ये अधिक महत्व आहे. उगाचच नको त्या गोष्टीकडे लक्ष वेधून समोर आलेल्या संकटाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. यामुळे दुर्लक्ष करणारेच अडचणीत येऊ शकतात.
महाराष्ट्रातील शेतकर्यांची स्थिती तर आजही वाईट आहे. पहिली सुकाणू समिती मुख्यमंत्र्यांच्या डावपेचामुळे भरकटली आणि दुसरी सुध्दा त्याच मार्गावर असल्यासारखे वाटत आहे. शेतकरी नेते एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. सदाभाऊ आणि राजू शेट्टींसारखे चळवळीतील शेतकरी नेते तर एकमेकांवर वैयक्तिक आरोप करत आहेत. त्यांनी आरोप करताना काही कौटूंबिक बाबीदेखील जगासमोर आणल्या आहेत, अशा परिस्थितीत राज्यातील शेतकर्यांनी अपेक्षातरी कुणाकडून करायची? शिवनसेनेसारखा पक्ष नक्की कुठे आहे, तेच कळत नाही. कालच शेतकर्यांसाठी शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी म्हणे भाजपला चांगलेच धारेवर धरले. पण त्यांची धार किती दिवस टीकणार हा देखील प्रश्नच आहे. कारण ते पुन्हा सत्तेच्या मळ्यात भाजपच्याच रांगेत जाऊन कधीही बसू शकतो.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. परंतू काही दिवसांनी भारत हा कृषीप्रधान देश होता, असे म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे. उत्तरप्रदेश वगळता आज देशातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील बहुतांश राज्यात सुरू आहे. त्याची आकडेवारी सुध्दा भयंकर आहे. या संकटातून सरकारच शेतकर्याला वाचवू शकते. शेतकर्यांसाठी सरकारची सुबुध्दीच विमा ठरु शकते, योग नव्हे.
योग साधना महत्वाची आहेच, पण तितकेच किंवा त्याहून अधिक महत्व शेतकरी आणि भारतातील कृषीसंस्कृतीला आहे. ती जपण्यासाठी सुध्दा अशाच प्रकारे सर्वांनी गल्ली ते दिल्ली एकत्र येणे गरजेचे आहे. कारण ‘कृषीयोग’च देशाला तारू शकतो. हा अग्रलेख लिहित असताना आणि देशभरात योग आणि फक्त योगाची चर्चा सुरू असताना शेतकरी आत्महत्येची आणखी एक घटना महाराष्ट्रात घडली. राज्यातील एका शेतकर्याने उच्च विद्यूतदाबाची तार हातात घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अशा प्रकारे मृत्यूला कवटाळणे किती भयंकर आहे हे तो शेतकरीच समजू शकतो. आता तरी ‘कृषीयोग’ किती महत्वाचा आहे हे आपण जाणले पाहिजे.