कृषी अधिकारी कार्यालयावर सोमवारी धरणे आंदोलन व निदर्शने

0

पाचोरा । तालुक्यातील कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी 19 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निदर्शने महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना शाखा पाचोरा यांच्या माध्यमातून करणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 10 जुलैपासुन बेमुदत आंदोलनाचा इशारा यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. राज्य शासनाने नुकताच स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. परंतु अद्याप कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल याबाबत कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मृद व जलसंधारण विभागाने कृषी सहाय्यकास पदोन्नतीने मिळणार्‍या पर्यवेक्षकाची सर्वच पदे आपल्याकडे घेतल्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

या मागण्यांसाठी छेडले आंदोलन
कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा. तो तयार करित असतांना संघटनेस विचारात घेण्यात यावे कारण सहाय्यकांची संघटना शासनमान्य आहे. तसेच सुधारित आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे, कृषी सहाय्यकांमधुन कृषी पर्यवेक्षकाची पदे 100 टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी. या प्रस्तावास सामान्य प्रशासन विभाग व विधी न्याय विभाग यांनी यापुर्वीच मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत पदोन्नती करतांना परिक्षेची अट घातली आहे. असे झाल्यास वरिष्ठ कृषी सहाय्यकांवर अन्याय होईल म्हणूनच परिक्षेची अट रद्द करण्यात यावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी हा शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वाशित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा. तसेच आंतर संभागीय बदलीबाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर दोन वर्षापासून प्रलंबीत आहे. संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करुनही त्यावर निर्णय झालेला नाही.

असे आहेत आंदोलनाचे टप्पे
19 जुन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निदर्शने, 21 ते 23 जुन जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण 27 जुन विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांचे कार्यालयावर धरणे आंदोलन व निदर्शने, 1 जुलै आयुक्त कृषी पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा व निदर्शने, व 10 जुलै पासुन बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा याप्रमाणे अध्यक्ष सुनिल सावळे, जिल्हा उपाध्यक्ष उमेश पाटील, सचिव राजेंद्र चौधरी, कोषाध्यक्ष निलेश पाटील, कार्याध्यक्ष कैलास घोंगडे, जिल्हा महिला प्रतिनिधी वैशाली पाटील, उपाध्यक्ष संदिप कचवे, सुभाष राठोड, सुनिल वारे, प्रसिद्धी प्रमुख समीर राजपुत, संघटक विद्यादेवी पानपाटील यांनी सह्यानिशी तालुका कृषि अधिकारी पाचोरा यांना दिले आहे.