नंदुरबार : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2021 या कालावधीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी विक्री व्यवहारास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, मिरची, भाजीपाला (नाशवंत) खरेदी विक्री करण्यासाठी बाजार समिती पहाटे 5 ते 11 या कालावधीत सुरू ठेवण्यात याव्यात. सकाळी 11 वाजेनंतर कुठलीही कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहणार नाही.
शेती विषयक दुकाने, बि-बियाणे,खते,किटकनाशके, शेती विषयक अवजारे, पशुखाद्य,कृषी साहित्याची दुरुस्ती, विक्री इत्यादी आस्थापना सकाळी 7 ते 11 या कालावधीत सुरु राहील. जिल्हा सिमा, जिल्ह्यातील चेक पोस्टवर शेती संबंधित धान्य माल विक्री वाहतूक करणाऱ्या वाहनांना तपासणीतून सुट राहील. शेती मालाबाबत कुणीही अफवा पसरवून शेतकऱ्यांची अडवणूक,फसवणूक करतांना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक अथवा फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल.
आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.