कृषी कायद्याचा निषेध: दोन नेत्यांकडून पद्मविभूषण पुरस्कार वापसी

0

चंदिगड: नव्या कृषी कायद्यांविरोधात उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, केरळ आणि पंजाबच्या शेतकरी संघटनांनी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाची हाक दिली होती. यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी चर्चा केली, अद्याप सकारात्मक तोडगा निघालेला नाही. दरम्यान, कृषी कायद्याचा निषेध म्हणून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाश सिंग बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. बादल यांच्यासह अकाली दलाचे नेते सुखविंदर ढींढसा यांनीही पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे.

अकाली दलाचे सर्वेसर्वा असलेल्या प्रकाश सिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानी पत्र लिहून कृषी कायद्यांचा विरोध केला आहे. तसेच शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. त्यासोबत बादल यांनी त्यांना देण्यात आलेला पद्मविभूषण सन्मान परत केला आहे.