इंदापूर । इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे (ता. इंदापूर) येथे बारामती अॅग्रीकलचर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या, ग्रामपंचायत शेटफळगढे आणि नागेश्वर विद्यालय यांच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावात 2 हजार 500 रोपांची लागवड करण्यात आली. नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी दिंडी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. गावाच्या विविध भागात चिंच, लिंब, करंज आदी झाडांची लागवड करण्यात आली. नागेश्वर विद्यालयातील जरांडे व कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी पर्यावरणाचे, झाडांचे, आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना पटवून दिले. यावेळी गावच्या सरपंच हेमलता भोसले, उपसरपंच आण्णा सिरसट, ग्रामपंचायत सदस्या शारदा सोनवणे, माउली भोसले यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.