कृषी प्रदर्शन शेतकरीवर्गाच्या आर्थिक विकासासाठी पूरक माध्यम ठरते

0

धुळे । शेतीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत असतो. असे प्रयोग कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे येतात. त्यामुळे कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या मैदानावर ग्रोवर्ल्ड व अहिराणी दूध संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रो-वर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार कुणाल पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, माजीमंत्री रोहिदास पाटील, कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी प्रदर्शनाचे आयोजक शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

शासन शेतकर्‍यांसोबत
शासन शेतकर्‍याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बोंडअळीमुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शासनामार्फत अशा शेतकर्‍यांना प्रती एकरी 36 हजाराची मदत जाहिर करण्यात येणार आहे. शहरात आयोजित करण्यात आलेले भव्य कृषी प्रदर्शन कौतुकास्पद असून दुग्धव्यवसायामुळे वेगळी ओळख असलेल्या खानदेशाचे गतवैभव परत मिळवूण देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्‍वास पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले यांनी व्यक्त केला.

योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावे
मंत्री ना.जानकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी शासन शेतकर्‍यांसाठी राबवित असलेल्या योजना तळागाळातील शेतकर्‍यांपर्यत पोहोचवाव्यात याबाबत सुचना केल्या. यावेळी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, प्रभारी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रापतवार, उपायुक्त वानखेडे आदी उपस्थित होते.

उद्योजक होईल
यावेळी मंत्री ना.जानकर म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतकर्‍याने शेती केल्यास शेतकरी समृध्द होऊन शेतकर्‍याचा मुलगा उद्योजक होण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले. शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले, या प्रदर्शनास शेतकरी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. जगदीश देवपूरकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. ना. जानकर यांनी शेतकर्‍यांशी साधलेल्या हृद संवादामुळे तरुण शेतकर्‍यांमध्ये उद्योजकीय मानसिकता घडण्याबाबत विचारचक्र सुरू झाल्याचे शेतकरीवर्गात बोलले जात आहे.