जळगाव । जिल्हा नियोजन बैठकीत गतवर्षातील खर्च व पुढच्या वर्षाच्या आराखड्यातील तरतुदींसह शासनाचा निधी किती आला व कोणत्या योजनेवर किती खर्च झाला हा मुद्दा अवघ्या पाच मिनिटात वाचून संपला. उपस्थित आमदारांनी फक्त आपल्या मतदार संघात न झालेली कामे, महावितरणकडून होणारी अडवणूक, कृषी-केळी संशोधन केंद्र काय संशोधन करते; यावर चर्चा केली. विद्यापीठ कृषी महाविद्यालय नामंजूर करण्याच्या बेतात असल्याचा आ.एकनाथराव खडसे यांनी केलेला आरोप खळबळ उडविणारा ठरला. जिल्ह्यात आरोग्य विभागात 60 टक्के जागा रिक्त असून त्या लवकर भराव्या अशी मागणी आमदारांनी केली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदारांना सांगितले की, यापुढे जिल्हा नियोजनाच्या बैठकीची विषयपत्रिका 15 दिवस अगोदर आमदारांना दिली जाईल. त्यांनर सर्व आमदारांनी आपले प्रश्न लिहून द्यावे,त्यांची उत्तरे देण्यात येतील. गोंधळ करून काहीच मार्ग निघणार नाही. 2016 मध्ये 305 कोटीचा सर्वसाधारण आरखाडा होता. यावर्षी 286.76 कोटीचा होता. यापैकीे 49 टक्के खर्च झाला आहे.
केळी संशोधन केंद्र निष्क्रीय
या आकडेवारीची माहिती दिल्यानंतर कोणीच प्रश्न विचारत नसल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक संपली असे समजु का? असे म्हणताच आ. हरिभाऊ जावळे यांनी शेतीच्या समस्या मांडण्यास प्रारंभ केला. पीकसंवर्धनासाठी 15 कोटींची तरतूद आहे. मात्र सध्या पिकांवरील रोगराईचे प्रमाण वाढत आहे. केळीवर बुरशीजन्य रोग आहे. कोणताही कृषी अधिकारी पाहणी करीत नाही आहे. केळी संशोधन केंद्रामधून कोणते संशोधन झाले. त्यांनी काय केले याबद्दल काहीच माहिती नाही. त्यांची प्रयोगशाळा काहीच काम करतांना दिसत नाही, असा ठपका आ. जावळे यांनी ठेवला. आज पिक शेतात उभे आहे. सरकारी यंत्रणांच्या कामचुकारपणाची अशीच परिस्थिती राहिली तर त्यांचे 25 टक्के पिकेही शेतकर्यांच्या हातात येणार नाही . 2016 -17 मध्ये 15 हजार शेतकर्यांचे ठिबकसाठी अर्ज आले होते. केंद्र व राज्य मिळून अनुदान 35 कोटी प्राप्त झाले होते. त्या अनुदानातून 8 हजार 900 शेतकर्यांना अनुदान दिले. उर्वरितांना अनुदान देण्यासाठी 19 कोटीची मागणी केली आहे. यावर्षी आतापर्यंत 18 हजार 55 अर्ज आले आहे. 6400 जणांना मंजुरी मिळाली आहे. केळीवरील बुरीशीसाठी राष्ट्रीय कृषी योजनेतर्गत दरवर्षी 6.5 कोटी रूपये येत. ते आ.खडसे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात मिळत होते.अशी माहिती कृषी अधिकार्यांनी दिली. आता ती रक्कम येत नाही. शेतकी महाविद्यालयासाठी 100 एकर जमिन दिली. हिगोणा येथे टिश्युकलचर महाविद्यालयासाठी 60 एकर जागा दिली आहे.
थकबाकीदार वाढले
जिल्हा बँकेच्या जुना नोटा घेतल्या तरी कर्जमाफीबद्दल संभ्रम असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.30 जुन 2016 पर्यंत कर्जदाराचे 1.5 लाख कर्ज माफ मात्र 30 जुन 2017 पर्यंत त्याचे व्याज कोण देणार ? थकबाकीदार शेतकरी 2017 मध्ये 20 टक्के आहेत चालु वर्षात थकबाकीदार शेतकरी 80 टक्के आहेत, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले यावर पालकमंत्री म्हणाले की, दुष्काळाने ग्रस्त चार वर्षेे रिझर्व्ह बँक मान्य करते मात्र गेल्यावर्षी दुष्काळ नव्हता.उत्पादन वाढले मात्र भाव पडले. त्यामुळे नुकसान झाले हे रिझर्व्ह बँक मान्य करीत नाही.
आ. भोळेंची मनपावर नाराजी
आ.राजुमामा भोळे यांनी मनपा कोणत्याच मुलभुत सुविधा देत नाही आहे. पावसाचे पाणी घरात शिरते. पिण्यासाठी पिवळे पाणी मिळते. तापीनदीत शेवाळे आहे. मुख्यमंत्र्यांनी मुलभुत सोयीसाठी 25 कोटी रूपये दिले आहे. ते त्यांनी कर्ज किवा पगारवाटप करण्यात खर्च करू नये. मनपा हद्दीतील शेतकर्यांना कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही. यावर कृषी अधिकार्यांनी सांगितले की मनपा व नपा हद्दीतील शेतकर्यांना योजनाचा लाभ देता येत नाही. याबाबत कृषी मंत्र्याबरोबर बैठक लावण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
निधी जि.प.कडे नको
यावेळी आमदारांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगितले की जिल्हा नियोजनातून आमदारांना मिळणारा निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्यात येतो. त्यांना विचारण्यात येत नाही किवा पत्र दिल्यावर त्यावर विचार सुध्दा होत नाही. पुन्हा निधी पीडब्ल्युडीकडे वर्ग करून त्यांच्यामार्फत कामे करावी .नंतर आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, नदीजोड प्रकल्पाचे जवळपास 90 टक्के काम झाले आहे. त्याचे खाते नियोजन समितीशी जोडले होते. आता 6 कोटींची आवश्यकता आहे. ते राज्य सरकारने दिल्यावर हा प्रकल्प पूर्ण होऊन 100 टक्के पाण्याचा वापर होणार.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्जवला पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार रक्षा खडसे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते. उपस्थितांमध्ये आ. स्मिता वाघ, आ. चंदू पटेल, आ. हरिभाऊ जावळे, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. संजय सावकारे,आ. शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. उन्मेष पाटील आदी उपस्थित होते.