धुळे : कृषी विद्यापीठाची घोषणा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हावी यासाठी आज कृषी विद्यापिठ निर्माण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. कृषी विद्यापीठासाठी २०१० पासून मागणी होत असून गेल्या दोन वर्षांपासून या मागणीने जोर धरला आहे. गेल्या २१ जानेवारीला महाविद्यालयीन युवक-युवतींचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यात ३० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तर शिक्षण संस्थाचालकांनी बंद ठेवून पाठींबा दिला होता.
नंदुरबार जिल्ह्याचाही पाठींबा
नंदुरबार जिल्ह्यानेही पाठींबा दर्शवित आ.चंद्रकांत रघुवंशी व मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यपालांकडे तशी मागणी नोंदविली आहे. शिवाय अमळनेर,पारोळा, चोपडा,चाळीसगाव,जळगाव यांनीही या मागणीला सहमती दर्शविली आहे. आघाडी सरकारने कृषि विद्यापिठ विभाजनाचा प्रस्ताव ठेवला असून त्यासाठी नेमलेल्या डॉ.एस.वाय.बी.थोरात यांच्या समितीने तसेच महायुतीच्या कुलगुरु डॉ.व्यंकटेश्वरलू समितीनेही नविन कृषीविद्यापिठ धुळयात होण्याचा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे धुळेकरांची मागणी रास्त असून जिल्ह्यातून सर्वपक्षीय दबावगट तयार करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. धरणे आंदोलनाप्रसंगी माजी आ.प्रा.शरद पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष हिलाल माळी, राजेंद्र पाटील, अतुल सोनवणे, यशवर्धन कदमबांडे, धीरज पाटील आदी उपस्थित होते.