कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची पाहणी

0

बारामती । राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमविषयक सुधारणाकरीता आत्माअंतर्गत बारामती तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी कृषी विभागाच्या केंद्रीय पथकाकडून करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय पथकातील सहसंचालक बलराम सिंग, शास्त्रज्ञ शैलेंद्र सक्सेना, विस्तार अधिकारी जे. पी. यादव, आत्माचे प्रकल्प संचालक सुनिल बोरकर, प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्‍वजित मगर उपस्थित होते.आत्माअंतर्गत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या कर्‍हामाई ग्रो प्रोड्युसर कंपनीस कृषी विभागाच्या केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. केंद्रीय पथकास प्रोड्युसर कंपनीचे संचालक विजय साळुंके यांनी कंपनी सदस्य संख्या, भागभांडवल उभारणी, कंपनीने राबविलेले उपक्रम याविषयी माहिती दिली.

प्रकल्प संचालक आत्माच्या पुढाकारातून यशस्वी झालेल्या जनावरांसाठी मुरघास ही संकल्पना प्रत्यक्षात पाहण्यासाठी शेतकरी हनुमंत जाधव यांच्या शेतावर भेट दिली. यावेळी त्यांनी मुरघास कसा तयार करायचा व बॅग कशा भरायच्या व मुरघास काळजी कशाप्रकारे घ्यायची याबाबतची माहिती पथकाने जाणून घेतली. प्रकल्प संचालक आत्माअंतर्गत जिल्हास्तरीय देशी गोवंश प्रशिक्षण राबविण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन देशी गाईचे संगोपन करीत असलेल्या श्री. वाबळे यांच्या गोठ्याची पाहणी करुन केंद्रीय पथकाने माहिती जाणून घेतली. राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमाच्या विस्तार विषयक सुधारणाकरीता आत्माअंतर्गत तालुक्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीबद्दल कृषी विभागाच्या केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.