धुळे । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांना केंद्रबिंदू मानले आहे. गरीब, शेतकर्यांचे कल्याण हाच त्यांचा ध्यास आहे. त्यांनी शेतकर्यांच्या विकासासाठी विविध योजना आणल्या आहेत. या योजनांचा लाभ कृषी विभागाने सामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवीत आगामी पाच वर्षांत शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचा संकल्प करावा. शेतकर्यांच्या सेवेची संधी सोडू नये, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. कृषी महाविद्यालयात कृषी विज्ञान केंद्र व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया मंथन : संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमाचे उद्घाटन आज सकाळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वीज, पाणी, शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, असे सांगितले.
मृद आरोग्यपत्रिकेचे वितरण
यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्याहस्ते मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण, संकल्प ते सिध्दी पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच दिलीप पाटील, संदीप भामरे, तवरसिंग राजपूत, निमेश महाजन, समाधान बागूल, प्रकाश पाटील, जयपाल गिरासे या शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. शासनाच्या योजनांचा लाभ घेत शेतकर्यांनी उत्पादन वाढविले पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेला संकल्प सिध्दीस न्यावा, असेही त्यांनी नमूद केले. जगदीश काथेपुरी, रमेश पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, राहुरीचे डॉ.किरण कोकाटे, डॉ.यशवंत फुलपगारे, नाबार्डचे महाप्रबंधक विवेक पाटील, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील आदी उपस्थित होते.