खडसे कृषिमंत्री असताना केली होती नियुक्ती
मुंबई :- माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांच्या काळात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केलेल्या डॉ. राम खर्चे यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत शासननिर्णय बुधवारी काढण्यात आला आहे. डॉ. राम खर्चे यांचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत असल्याचा जीआर राज्याच्या कृषी विभागाने काढला आहे. या पदावर डॉ. राम खर्चे यांची निवड तत्कालीन कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या काळात झालेली होती. डॉ. राम खर्चे हे खडसे यांचे विश्वासू होते. कृषी क्षेत्राबाबत त्यांचा दांडगा अभ्यास असल्यामुळे त्यांची उपाध्यक्षपदावर वर्णी लागली होती.
३ वर्षे पूर्ण झाल्यामुळे तात्काळ कार्यमुक्त
राज्याचे कृषी मंत्री हे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर उपाध्यक्षपदी कृषी क्षेत्रातील अभ्यासू व व्यासंगी व्यक्तीची नेमणूक केली जाते. ही नेमणूक ३ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा राज्य शासनाची मर्जी असेपर्यंत ठेवण्यात येते. डॉ. राम खर्चे यांच्या नेमणूकीला ३० मार्च २०१८ला ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे डॉ. राम खर्चे यांना उपाध्यक्ष पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.