कृषी सहाय्यक संघटनेतर्फे धरणे आंदोलन

0

धुळे । कृषी पर्यवेक्षकांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या सर्व कर्मचारी, पदाधिकारी संपावर उतरले असून सोमवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. या विभागाने कृषी सहाय्यकास पदोन्नतीने मिळणार्‍या पर्यवेक्षकांची सर्व पदे मृद व जलसंधारण विभागाकडे घेतली आहेत.

कृषी विभागाचा सुधारीत आराखडा तयार करण्यात यावा, असल्याने त्यात बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. कृषी सेवक पदाचा 3 वर्षाचा कालावधी हा शिक्षक सेवकांप्रमाणे आश्‍वासीत प्रगती योजना व सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा, आदी मागण्यांसाठी धरणे करण्यात येत आहे. यावेळी सिद्धार्थ वाघ, डी.एस. पाटील, बी. के. बोरसे, जीवन पिंपळे, एस. एल. राजपूत, पी. डी. पवार, दीपक झाल्टे, अमोल बोरसे, रिना देवरे, सरिता अहिरे, दिपाली पाटील यांच्यासह कृषी सहाय्यक सहभागी झाले होते.