कृष्णप्पाला भारत अ संघातून डच्चू

0

नवी दिल्ली । कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतमला शिस्तभंग केल्याप्रकरणी भारत अ संघातून डच्चू देण्यात आला आहे. आगामी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध चार दिवसीय लढतीसाठी गौतमचा भारत अ संघात समावेश होता. मात्र, दुलीप चषकाचा अवमान केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई झाली. गौतमने यापूर्वी टायफॉईड झाल्याचा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत दुलीप चषकातून माघार घेतली. पण, नंतर लगेच तो केपीएलमध्ये बेळगाव पँथर्स संघातर्फे खेळला होता. त्यावरुन ही कारवाई केली गेली. कृष्णप्पा गौतमऐवजी आता विदर्भचा लेगस्पिनर कर्ण शर्माची 15 सदस्यीय भारत अ संघात वर्णी लागली आहे.

अ संघातील ही लढत 23 सप्टेंबरपासून विजयवाडा येथे होणार आहे. वास्तविक, गौतम दुलीप चषकात एक लढत खेळला. 8 सप्टेंबर रोजी इंडिया ग्रीन संघातर्फे लखनऊ येथे पाच विकेट मिळवल्या होत्या. अर्थात, सामन्यातील दोन दिवस बाकी असताना तो आजारी पडला आणि शेवटच्या दिवशी इंडिया रेड संघाकडून मैदानातही उतरु शकला नाही. नंतर त्याने आपल्याला टायफॉईड असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत पुढील दुलीप लढतीतून माघार घेतली.