मुंबई । राज्याचे व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी जागतिक वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन विची फ्रांस आयोजित द आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत स्पृहणिय यश मिळविले आहे.16 तासांच्या कालावधीत सुमारे 3.86 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे आदी आव्हाने पूर्ण करायची असल्यामुळे ही ट्रायथ्लॉन स्पर्धे जगभरात लोकप्रिय आहे. कृष्णप्रकाश यांनी हे तिन्ही प्रकार 14 तास 8 मिनिटे 23 सेकंदात पूर्ण केले. गेली 6 महिने प्रत्येक रविवारी कृष्णप्रकाश पुणे ते मुंबई हे अंतर सायकलने 6 तासात पूर्ण करीत असत. दररोज सकाळी पहाटे 4 वाजता महालक्ष्मी रेसकोर्सवर 20 किलोमीटर धावण्याचा ते नियमित सराव करीत. या स्पर्धेत केवळ सहभागी व्हायचे नाही तर अखंड परिश्रम घेऊन यात विक्रमी वेळेत यश प्राप्त करायचेच, हे त्यांचे ध्येय होते. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. भारतीय सनदी सेवेतून आयर्नमॅन स्पर्धेत यश प्राप्त केलेले ते एकमेव अधिकारी आहेत.