महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून कामाला सुरुवात
पिंपरी : कृष्णानगर येथील श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार सभामंडप आणि सीमा भिंतीचे काम तसेच निगडीतील मारुती मंदिरात देखील सभामंडपाचे काम सुरु करण्यात आले आहे. महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून हे काम केले जात असून कामगार नेते सचिन लांडगे यांच्या हस्ते मंगळवारी कामाचे भूमीपूजन झाले. कृष्णानगर येथील सिद्धीविनायक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पावसापासून संरक्षण होण्यासाठी सभामंडप आणि सीमा भिंतीचे काम करुन देण्याची मागणी केली होती. श्री विठ्ठल आणि श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरासमोरील प्रांगणात लहान मुलांना खेळ, तसेच कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. योगासने शिबिरे असतात. ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी बसतात. त्यामुळे ऊन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी सभामंडप आणि सीमा भिंत बांधून देण्याची मागणी परिसरातील सोसायटीतील नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. त्याला आमदार लांडगे यांनी तत्काळ होकार दिला.