कृष्णा सिंगचे दोन नवीन स्पर्धा विक्रम

0

मुंबई । इंडिया मास्टर्स ऍथलेटिक आयोजित पंचरंगी ऍथलेटिक स्पर्धेचा दुसरा दिवस युनिव्हर्सल स्पोर्ट्स असोसिएशनच्या कृष्णा सिंगने गाजवला. क्रिष्णाने 20 वर्ष मुलांच्या तिहेरी उडी आणि लांब उडी स्पर्धेत नवीन स्पर्धा विक्रम नोंदवले. कृष्णाने तिहेरी उडीत क्रीडा प्रबोधिनीच्या किरण भोसले आणि भालाफेकीत साइच्या शिवम यादवचा जुना स्पर्धा विक्रम मोडीत काढला. कृष्णाने तिहेरी उडीत 14.24 मीटर असा नवीन उच्चाक नोंदवत किरणने नोंदवलेला 13.24 मीटरचा विक्रम पुसून टाकला. अचिव्हर्स अकादमीचा प्रणव राजे (12 .33 मीटर) आणि ट्रॅक अँड फिल्डचा अथर्व खेडेकर ( 11.85 मीटर ) अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर राहिले.

शिवम यादवला मागे टाकताना कृष्णाने भालाफेकीत 47.75 मीटर अशी कामगिरी साधली. शिवमचा उच्चाक 42.51 मीटरचा होता. शिवमला यावेळी 37.95 मीटर अशा कामगिरीसह दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. साइचाच दुर्गा डोग्राने 37.94 मीटर अशा कामगिरीसह तिसरे स्थान मिळवले. अन्य स्पर्धामध्ये साइच्या राजवंत गुप्ताने 20 वर्ष मुलांच्या उंच उडीत आणि ट्रॅक अँड फिल्डच्या इशा रामटेकेने 12 वर्ष मुलींच्या लांब उडीत नवे स्पर्धा विक्रम नोंदवले. राजवंत गुप्ताने यावेळी दुसर्‍या स्थानावर राहिलेल्या युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकादमीच्या सुशांत पेटकरचा 1.80 मीटरचा विक्रम मोडला. राजवंतने 1.85 मीटर अशा कामगिरीसह पहिले स्थान मिळवले तर सुशांतला 1.77 मीटर अशा कामगिरीमुळे दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. विनर स्पोर्टसचा ओंकार आचरेकर (1.65 मीटर ) तिसर्‍या स्थानावर राहिला. इशाने लांब उडीत अव्व्ल स्थान मिळवताना 4.44 मीटर अशा कामगिरीसह अचिव्हर्सच्या सृष्टी हुल्लरचा 4;19 मीटरचा विक्रम पुसून टाकला.