रोहण बोपण्णा- पूरव राजा पराभूत
एडमंटन । डेव्हिस चषक स्पर्धेतील जागतिक प्ले ऑफ गटातील लढतीत कॅनडाने महत्वाचा दुहेरीचा सामना जिंकून भारतावर २-१ अशी आघाडी मिळवली आहे. कॅनडाच्या डॅनियल नेस्टर आणि वॉसेक पॉसपिसिल या जोडीने रोहण बोपण्णा आणि पूरव राजा या भारतीय जोडीचा पराभव करत संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. या लढतीतील पहिल्या दिवशीच्या १-१ अशा बरोबरीमुळे बोपण्णा आणि राजा दुहेरीच्या सामन्यात भारताला आघाडी मिळवून देतील अशी आशा होती. पण दोन तास ५२ मिनिटे खेळल्या गेलेल्या सामन्यात या जोडीला पराभव पत्कारावा लागला.
नेस्टर आणि पॉसपिसिल या जोडीने हा सामना ७-५, ७-५, ५-७, ६-३ असा जिंकत कॅनडाला या सामन्यात आघाडीवर नेले. लढतीच्या पहिल्या दिवशी रामकुमार रामनाथनने पहिला एकेरीचा सामना जिंकला होता. तर युकी भांबरीचा पराभव झाला होता. दुहेरीचा सामना गमावल्यामुळे भारताची दारोमदार आता पुन्हा रामकुमार आणि युकीवर आहे. या दोघांनी परतीच्या एकेरीच्या लढती जिंकल्यास भारताला जागतिक गटात स्थान मिळेल.या लढतीतील विजेत्या संघाला २०१८ मध्ये जागतिक गटात खेळण्याची संधी मिळणार आहे. परतीच्या एकेरीच्या सामन्यात रामकुमारचा सामना डेनिस शापोवालोव्हशी आणि युकीचा सामना ब्रॅडन शेनरशी होणार आहे. भारताला मागील सलग तीन वर्षे जागतिक गटात पराभव पत्कारायला लागत आहे.