कॅनरा बँकेला आठ कोटी रुपयांचा दंड

0

नवी दिल्ली-इंग्लंडच्या आर्थिक क्षेत्रातील नियंत्रक संस्थेने एफसीएने कॅनरा बँकेला आठ कोटी रुपयांचा (८,९६,१००पौंड) दंड ठोठावला आहे. तसेच कॅनरा बँकेच्या लंडनस्थित शाखेला पाच महिने ठेवी स्वीकारता येणार नाहीत असा आदेशही दिला आहे. आर्थिक अफरातफरीविरोधातील नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत हा दंड ठोठावण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

८,९६,१०० पौंडांचा दंड

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या कॅनरा बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळवलं आहे की बँकेच्या ज्येष्ठ व्यवस्थापनाने एफसीएला संपूर्ण सहकार्य केले असून ज्या काही उणीवा होत्या त्यांचं निराकारण करण्यात आले  आहे. एफसीएने दिलेल्या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे की, कॅनरा बँकेला ८,९६,१०० पौंडांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच १४७ दिवसांसाठी नवीन ग्राहकांकडून ठेवी स्वीकारता येणार नाही असे बंधनही कॅनरा बँकेच्या लंडन शाखेवर घालण्यात आल्याचे एफसीएने  आपल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे.

२१० दिवसांचा निर्बंध

ही कारवाई करण्याचे कारण सांगताना एफसीएनं म्हटलंय की कॅनरा बँकेने २६ नोव्हेंबर २०१२ ते २९ जानेवारी २०१६ या कालावधीत प्रिन्सिपल ३ चा भंग केला आहे. जोखीम व्यवस्थापन यंत्रणा चोख असावी यासाठी व्यवस्थापनानं नी जबाबदार अधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी असं हे प्रिन्सिपल ३ सांगते. एफसीएच्या सुरूवातीच्या चौकशीमध्येच समस्या नीच हाताळण्याची तयारी कॅनरा बँकेने दर्शवली असल्यामुळे बँकेला ठोठावण्यात आलेला दंड ३० टक्क्यांनी कमी करत असल्याचा दिलासाही एफसीएने दिला आहे. मूळ दंडाची रक्कम १२,८०,१७५ पौंड होती जी कमी करून ८,९६,१०० पौंड किंवा ८ कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच ठेवी स्वीकारण्यावर २१० दिवसांचा निर्बंध घालण्यात आला होता, जो कमी करून १४७ दिवसांचा करण्यात आला आहे.