खडकी : रेंजहिल्स सीएसडी मिलिटरी कॅन्टीनच्या 48 हजार 651 रुपये किंमतीच्या वस्तू चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे प्रभाकर उर्फ देव्या कमलाकर शिंदे (वय 30) व शुभम केशव भोसले (वय 22, दोघे रा.बोपोडी) असे आहे. सुभाषचंद्र यादव (वय 33, रा.खडकी ) यांनी फिर्याद दिली.
हे देखील वाचा
यादव हे एक्सप्रेस कार्गो कंपनी येथे कंटेनरचे वाहनचालक म्हणुन नोकरीस आहेत. राज्यातील सर्व मिलिटरी कॅन्टीनमधील वस्तू सामान पोहचविण्याचे काम एक्सप्रेस कार्गो कंपणीच्यावतीने केले जाते. यादव हे चाकण येथिल गोदामातुन रेंजहिल्स येथिल सीएसडी कॅन्टीनचे सामान घेऊन आले. कंटेनरमधील सामान उतरविण्यास विलंब झाल्याने यादव यांनी कंटेनर मोकळ्या जागेत लावला. अज्ञात चोरट्यांनी त्याचा फायदा घेत कंटेनचे मागच्या दाराचे टाळे तोडुन त्यातील युनायटेड कंपनीचे तीन बॉक्समधील 36 प्रेशर कुकर, प्रेमियोचे इलेक्ट्रीक वॉटर हिटरचे तिन नग असा एकुन 48 हजार 651 रुपयांचा ऐवज लंपास केला. दुसर्या दिवशी यादव कंटेनरमधील सामान खाली करण्यास आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. तपास पथकातील पोलीस कर्मचारी सोपान अण्णा ठोकळ व हेमंत माने यांना खबरी मार्फत आरोपींचा छडा लागला. पोलिसांनी सापळा रचुन आरोपी शिंदे व भोसले यांना पकडले. आरोपींकडुन 34 हजार 857 रुपयांचा ऐवज जप्त केला. उप निरिक्षक मदन कांबळे, उप निरिक्षक निलेशकुमार महाडीक, कर्मचारी सोपान ठोकळ, हेमंत माने, सुरेश गेंगजे, राजकिरण पवार, विशाल मेमाणे, गणेश लोखंडे आदी पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.