कॅन्टोन्मेंटचे अधिकार्‍यांची सूडबुध्दीने कारवाई

0

धर्मगुरू सॉलोमन भंडारे यांचा तक्रारअर्ज

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासनातील अधिकारी अनेक चुकीची कामे करीत आहेत. त्यांच्या गैरव्यवहाराची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविली होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डातील वरीष्ठ अधिकार्‍यांकडून वैयक्तीक सूड उगविण्यासाठी कारवाई केली जाते. अधिकारी खूनशी स्वभावाचे आहेत. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. असे गंभीर आरोप अधिकार्‍यांवर करण्यात आले आहेत. याबाबत शितळानगर येथील धर्मगुरू सॉलोमन भंडारे यांनी तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दिला आहे. मात्र, बोर्डाने अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण कारवाई केल्याचा राग धरून हे आरोप केले जात असल्याचे बोर्डाच्या कार्यालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले.

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गालगत शितळानगर येथे धार्मिक स्मृतिस्तंभ व ध्वज लावण्यात आला होता. या भागात दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमण विभागाने कारवाई केली. तेव्हा हा स्मृतिस्तंभ आणि ध्वजस्तंभही हटविण्यात आला होता. या कारवाईनंतर धर्मगुरू भंडारे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविली. ही माहिती बोर्डाच्या गैरकारभाराशी संबंधित होती, असे सालॅमनराज भंडारे यांचे म्हणणे आहे. कॅन्टोन्मेंटच्या अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार व गैरकारभार सुरू आहे.

मिळकतीशी आपला संबंध नाही
मात्र, ही माहिती मागविल्यामुळे बोर्डाच्या अधिकार्‍यांनी शितळानगर नं. 2 येथे अतिक्रमण विभागाचे पथक पाठवून एका मिळकतीचे मोजमाप घेतले. तसेच सॉलोमन भंडारे यांच्या नावाने घर क्रमांक 529 या मिळकतीकरीता पीपीई कायद्यानुसार नोटीस पाठविण्यात आली. संबंधित मोजणी करण्यात आलेल्या मिळकतीशी आपला संबंध नाही. तसेच ज्या संदर्भात नोटीस पाठवण्यात आली, अशी कुठलीही मिळकत माझ्या नावे नाही. तशी मिळकत असेल तर बोर्डानेच ती आपणांस शोधून द्यावी, अशी मागणी भंडारे यांनी केली आहे. आता याबाबत पोलीसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यासंदर्भात बोर्डाच्या संबंधित अधिकार्‍यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता व्यक्त केली.