पुणे : लोकसभेसाठी इच्छुक असलेले खा. संजय काकडे यांनी आता पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटच्या प्रश्नात लक्ष घातले असून अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या भेटीसाठी त्यांनी तीन जानेवारीची वेळ मागितली आहे. त्यावेळी सर्वपक्षीय सदस्यांना घेऊन ते जेटली यांना भेटणार आहेत.
खा.संजय काकडे हे राज्यसभा सदस्य असून ते भाजपशी संलग्न आहेत. पुण्यातून लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असून तसे त्यांनी जाहीरपणे सांगितलेही आहे. त्यादृष्टीने त्यांनी संपर्क, बैठका चालू केल्या आहेत. नुकतीच त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांबरोबर चर्चा केली. पुणे लोकसभा मतदारसंघात पुणे आणि खडकी या दोन कॅन्टोन्मेंट बोर्डांचा समावेश आहे.
हे देखील वाचा
जीएसटी सुरू होण्यापूर्वी एलबीटी च्या माध्यमातून सुमारे दीडशे कोटी रुपये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला मिळायचे. जीएसटी लागू झाल्यावर एलबीटीचे दीडशे कोटी बंद झाले. सध्या विकास कर आणि इतर सर्व कर मिळून बोर्डाला ९७ कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळते आणि वार्षिक खर्च १३१कोटी रूपये आहे. हे पहाता बोर्डाला ३४ कोटींचा तोटा होतो. त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली. आर्थिक संस्थांमध्ये ठेवलेल्या १००कोटींच्या मुदत ठेवीतील ७०कोटी रुपये खर्च झाले आहेत. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी १००कोटी रुपये मिळावेत असे बोर्डाच्या सदस्यांनी सुचवले. बोर्डाच्या मुख्य लेखापालांनी ही वस्तूस्थिती काकडे यांच्यासमोर मांडली. त्यावेळी काकडे यांनी तीन जानेवारीला आपण अरुण जेटली यांना भेटू असे सांगून दौरा निश्चित केला आहे.
काकडे यांनी घेतलेल्या बैठकीला बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका शिरगीरी, नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, शैलेश बिडकर, मथुरावाला, किरण कांबळे याखेरीज डॉ. भारत वैरागे मनिष साळुंके आदी उपस्थित होते.