देहूरोड । मधुमेहासारख्या विकाराच्या रुग्णांची वाढती संख्या तसेच या विकारावरील महागडी उपचार पद्धती विचारात घेऊन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात या आजारावर उपचार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नुकताच बोर्डाच्या मासिक सभेत घेण्यात आला. यासाठी कंत्राटी तत्वावर तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. सर्व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मधुमेहासारखा जीवघेणा विकार भारतात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्याची झळ छोट्या शहरांपासून गावपातळीवर पोहचली आहे. खर्चिक उपचार पध्दतीमुळे या आजाराकडे बरेच रुग्ण दुर्लक्ष करतात. परिणामी हृदयरोग, दृष्टीदोष किंवा मूत्रपिंडांच्या मोठ्या आजारांना बळी पडतात. शहरातील रुग्णांची मोठी संख्या विचारात घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लवकरच मधुमेहावर उपचार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांनी यासंदर्भातील प्रस्ताव बैठकीत मांडला. अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले. उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, बोर्ड सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, सारिका नाईकनवरे, अॅड. अरूणा पिंजण, रघुविर शेलार, ललित बालघरे, गोपाल तंतरपाळे यांनी बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.
उपचारात सवलत
कॅन्टोन्मेंट हद्दीत मध्यमवर्गीय तसेच गरीब, दारीद्रय रेषेखालील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरेल. बोर्डाने अशा रुग्णांना उपचारात सवलत तसेच स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी उपसूचना शेलार आणि खंडेलवाल यांनी मांडली. त्याला मारिमुत्तू अनुमोदन दिले. बोर्डाच्या या निर्णयाचे शहरावासीयांकडून स्वागत होईल, असा विश्वास यावेळी अधिकार्यांनी व्यक्त केला.