कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षांना काळे फासण्याचा प्रयत्न

0
खडकी : विसर्जन मिरवणुकीतील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष चासकर व सदस्यांवर काळा बुक्का फेकुन काळे फासण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी मंडळाच्या चार कार्यकर्त्यांना रविवारी अटक केली. विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी उभारलेला स्टेज यावेळी कोसळला. या घटनेत ज्येष्ठ सदस्य कांबळे हे जखमी झाले.
विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळाचे स्वागत करण्याकरीता येथील गांधी चौकात हिंदु युवक संघटनेच्यावतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. उपाध्यक्ष कमलेश चासकर व सदस्य सुरेश कांबळे, अभय सावंत व दुर्योधन भापकर हे उपस्थित होते. येथील डेपो लाईन मित्र मंडळाची मिरवणूक आली असता कार्यकर्त्यांनी चासकर व सदस्यांवर बुक्का फेकला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते व वरिष्ट पोलिस निरीक्षक राजेंन्द्र मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते शैलेश गर्गे, बंडु उर्फ अक्षय शिंदे, मिलिंद खाडे व चेतन गाडे यांना रात्री अटक केली. शासनाने बंदी घातलेल्या डी.जे.चा निषेध व्यक्त करण्याकरीता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बुक्का उधळला. या घटने संदर्भात मंडळाचे दोन पदाधिकारी मोहन पवार व अजित पवार यांनाही चौकशी करीता ताब्यात घेतले. दरम्यान या घटनेनंतर काही वेळाने स्वागत कक्ष असलेला स्टेज कोसळला गेला.