कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला अखेर मंजुरी

0

गेल्या वर्षभरापासून रखडल्यानंतर विशेष सभेत दिली संमती; खाससभेत रंगले नाराजी नाट्य

पुणे : गेल्या वर्षभरापासून निविदा प्रक्रियेत रखडलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला बर्‍याच वादविवादानंतर अखेर सोमवारी मंजुरी मिळाली. बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल प्रिथी सिंह यांनी विशेष सभेत दिलेल्या संमतीनंतर बोर्डाच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा मंजूर करण्यात आल्या.

बोर्डाच्या हडपसर येथील कचरा डेपोवरील ओल्या व सुक्या कचर्‍यापासून जळाऊ इंधनाच्या निर्मितीसाठी प्रशासनाने निविदा मागविल्या होत्या. त्याला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एका कंपनीने प्रतिटन 277 रुपये एवढ्या कमी दरात काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र या कंपनीच्या निविदा सदोष असून, या कंपनीला हा ‘टेंडर’ दिला जाऊ नये, अशी मागणी बोर्डाचे नगरसेवक दिलीप गिरीमकर यांनी केली होती.

गिरीमकर यांच्या हरकतीची दखल घेत, या निविदा प्रक्रियेची पडताळणी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीनेदेखील आपल्या अहवालात ही निविदा प्रक्रिया योग्य असून, संबंधित कंपनीला होकार देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तज्ज्ञ समिती, बोर्डाचे इतर सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहमतीनंतर प्रिथी सिंह यांनीदेखील संबंधित कंपनीला निविदा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार या कंपनीच्या निविदा मंजूर करून घेत, त्यावर लवकरच काम सुरू करणार असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. यादव यांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील कचरा डेपोच्या जागेवरील कचर्‍याच्या विल्हेवाटीच्या निविदेवरून सोमवारी झालेल्या खाससभेत नाराजी नाट्य रंगले. निविदेसाठी पात्र ठरलेल्या कंपनीने बनावट अनुभवपत्र सादर केल्याचा धक्कादायक आरोप गिरमकर यांनी केला, तर पात्रतेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता संबंधित कंपनीने केल्याचा दावा बोर्डाच्या तज्ज्ञ समितीने केला. अखेर बोर्डाच्या अध्यक्षांनी तज्ज्ञ समितीचा दावा विचारात घेत निविदा मंजूर केली. मात्र, हा निर्णय योग्य नसल्याची नाराजी व्यक्त करत गिरमकरांनी सभात्याग केला.