देहूरोड : विशेष प्रतिनिधीदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सातही वॉर्डात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांच्या वेळोवेळी निविदा सूचना प्रसिध्द होतात. मात्र, प्रसिध्द होणार्या निविदा सूचना इंग्रजी भाषेत असल्यामुळे स्थानिक ठेकेदारांना त्याचा लाभ मिळत नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाने या निविदा सूचना मराठी भाषेतून प्रसिध्द कराव्यात, अशी मागणी देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने मागील अडीच वर्षात सुमारे 15 कोटींची विविध विकासकामे केली आहेत. पुढच्या टप्प्यात आणखी 35 कोटींची कामे होणार आहेत. या सर्व कामांच्या निविदा सूचना वेळोवेळी प्रसिध्द केल्या जातात. मात्र, प्रसिध्द करण्यात येणार्या निविदा बहुदा इंग्रजी भाषेतील असतात. स्थानिक प्रादेशिक भाषेला प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश असल्यामुळे तसेच स्थानिक नागरिकांना या निवीद सूचनेचा बोध व्हावा यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने मराठी भाषेतूनही प्रसिध्द करणे आवश्यक आहे. यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाला नुकतेच पत्र देण्यात आले असून या पत्रावर शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे, मिकी कोचर, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते यदुनाथ डाखोरे यांच्या सह्या आहेत.