कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहनांना प्रवेश शुल्क

0

खडकी । कॅन्टोन्मेंट हद्दीतील वाहन प्रवेश शुल्क हे वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) मोडत नसल्याचा लेखी खुलासा दिल्ली येथील लष्कराच्या मालमत्ता विभागाचे महासंचालक जोजनेश्वर शर्मा यांनी शनिवारी दुपारी खडकी, पुणे, देहुरोडसहीत देशभरातील सर्व कॅन्टोन्मेट बोर्डांना कळविला आहे. त्यामुळे मागील महीनाभरापासून बंद करण्यात आलेले वाहन प्रवेश शुल्क पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी (31 जुलै) बोलविण्यात आलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत यावर शिक्का मोर्तब होणार असून 1 ऑगस्टपासून वाहन प्रवेश शुल्क पुर्ववत सुरू होण्याची शक्यता कॅन्टोन्मेंट प्रशासनाने वर्तवली आहे.

देहु कॅन्टोन्मेंटला 20 कोटींचा फटका
देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्याने खडकी-पुणे, देहुरोडसहीत राज्यातील सात तर देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डातील महसुलाचे महत्वाचे स्त्रोत असलेले वाहन प्रवेश शुल्क 30 जूनच्या मध्यरात्रीपासुन बंद करण्यात आले होते. त्यामुळे खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डास वार्षीक 10.50 कोटी तर देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला 20 कोटींचा फटका बसणार होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या विकासावर परीणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मागील एक महिन्यापासून वाहन प्रवेश शुल्क बंद असल्याने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा 90 लाखाचा महसूल बुडाला आहे.

वाहन शुल्क जीएसटीत मोडत नाही
दिल्ली येथील लष्कराचे मालमत्ता विभागाचे महासंचालक जोजनेश्वर शर्मा यांनी वाहन प्रवेश शुल्क जीएसटीत मोडत नसल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले. त्यामुळे महीनाभरापासून बंद अवस्थेत असलेले वाहन प्रवेश शुल्क हे पुन्हा पुर्ववत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.