कॅन्व्हासवर चित्र रेखाटणारे रॉबर्ट गील पहिले चित्रकार

0

इतिहास अभ्यासक प्रा.डॉ.पी.डी.जगताप ; भुसावळात स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

भुसावळ- जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील चित्र कॅन्व्हासवर काढून जगासमोर प्रथम पोहाचविणारे मेजर रॉबर्ट गील हे पहिले चित्रकार आहेत. त्यांनीच या लेणीतील रंगविलेले कलात्मक व बोधपूर्ण चित्र (कॅन्व्हासवर)काढून इंग्लंड येथे चित्र प्रदर्शनात ठेवले होते, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा.डॉ.पी.डी.जगताप (जळगाव) यांनी येथे केले. ते अजिंठा लेणीतील चित्रकलेचे अभ्यासक व चित्रकार रॉबर्ट गील यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास फादर जोसेफ डेनिस, रेव्हरंड गायकवाड, रेव्हरंड स्वप्नील नाशिककर, रेव्हरंड किशोर गायकवाड, जयसिंग वाघ (जळगाव), सुरेश आमोदेकर (अमळनेर), प्रा.डॉ.दिनेश महाजन, प्रा.डॉ.जतीन मेढे, विश्वास वळवी आदी प्रमुख उपस्थित होते.

रॉबर्ट गील यांच्या स्मृती कलेसाठी सदैव प्रेरणा देतील
पी.डी.जगताप म्हणाले की, भारतीय प्राचीन चित्रकलेची जगाला मिळालेली अमूल्य देणगी म्हणजे अजिंठा-वेरूळ या लेण्यांमधील शिल्प आणि चित्रकला आहे. नैसर्गिक रंग तयार करून ही चित्र बनविलेली आहेत. मद्रास ब्रिटिश आर्मीत असलेले रॉबर्ट गील हे चित्रकलेचे साधक आणि अभ्यासक असल्यामुळे या लेणीतील चित्रांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची अजिंठा येथे विशेष नियुक्ती ब्रिटिश आर्मीने केली होती. अजिंठा येथील लेणी आणि चित्रकलेच्या प्रेमात ते पडल्यामुळे ब्रिटिश आर्मीतून निवृत्त झाल्यावर इंग्लड येथे न जाता ते अजिंठा येथेच शेवटपर्यंत राहिले. अगदी शेवटचे काही दिवस भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटल येथे उपचार घेत असतांना त्यांचे येथेच निधन झाले. भुसावळातील ख्रिस्ती चर्च येथेच त्यांचा अंतिम विधी झाला. ज्या महान अभ्यासकाने आमच्या प्राचीन बौद्ध कलेचा वारसा असलेल्या लेण्यातील शिल्प आणि चित्र कलेला जगासमोर नेऊन जगप्रसिद्ध केले त्या रॉबर्ट गील यांच्या स्मृती कलेसाठी सदैव प्रेरणा देत राहतील, असेही ते म्हणाले.

गील यांनी केला अमरावतीतील जैन मंदिराचा अभ्यास
या प्रसंगी जयसिंग वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. मेजर रॉबर्ट गील हे चित्रकलेचे अभ्यासक असल्याने त्यांनी अजिंठा लेणी सोबतच वेरूळ, लोणार आणि अमरावती येथील जैन मंदिरातील चित्रकलेचा अभ्यास केला होता.तेथीलही चित्र त्यांनी काढली होती. सुरेश आमोदेकर यांनी रॉबर्ट गील यांच्या चित्रकलेच्या क्षेत्रातील कार्याची माहिती सांगून स्व.मधुकरराव चौधरी यांनी स्व.तांबट सरांच्या माध्यमातून त्यांचा स्मृतीदिन या ठिकाणी साजरा करण्याची परंपरा सुरू केली. त्यामुळे नव्या पिढीला अजिंठा वेरूळ लेण्यातील चित्रकलेच्या या थोर कलावंत अभ्यासकाचे कार्य प्रेरणा देत राहील, असेही ते म्हणाले. याप्रसंगी चर्चचे पंच मंडळ प्रतिनिधी प्रेमचंद एस.जाधव, जया फ्रान्सिस मणी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचलन रेव्ह. किशोर गायकवाड तर आभार रेव्ह.स्वप्नील नाशिककर यांनी मानले.