कॅन्सरग्रस्त पतीसाठी पत्नी, मुलीचा लढा

0

एरंडोल। शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या आदिवासी भिल्ल समाजातील 55 वर्षीय पतीला झालेल्या घशाच्या कॅन्सर या जीवघेण्या आजारावरील उपचारासाठी पत्नीने यशस्वी संघर्ष करून उपचार केले. तर कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मुलीनेही या परिस्थितीत यशस्वी लढा देऊन वडिलांच्या उपचारासाठी प्रयत्न केले. आदिवासी समाजाच्या गरीब कुटुंबावर कोसळलेल्या या संकटावर मात करण्यासाठी परिसरातील सर्व पक्षीय युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्ष भेद जातीच्या भिंती बाजूला ठेऊन एकत्र येऊन या पिडीत कुटुंबाला सहकार्य करून माणुसकीचे जिवंत उदाहरण दाखवुन दिले. सामाजिक क्षेत्रात कार्यकरणार्‍या सुखकर्ता फाउंडेशनच्या वतीने या आदिवासी माय लेकींचा सत्कार करून आर्थिक मदत केली.

उपचारासाठी माय-लेकीची धडपड : आशाबाई व शालूबाई या माय-लेकींनी देखील उपचारासाठी पैसे जमविण्यास सुरुवात केली. उदरनिर्वाहासाठी असलेल्या स्वमालकीच्या बकर्‍या विकुन तसेच हात उसनवारी करून आदिवासी माय-लेकींनी काही प्रमाणात पैसा उपलब्ध केला. त्यांना युवा कार्यकर्त्यांनी देखील आर्थिक स्वरूपात मदत केली. जमा झालेल्या रकमेतून हिरालाल नाईक यांची तपासणी करून शस्त्रक्रिये पूर्वीचे उपचार केले. आदिवासी माय-लेकींची जिद्द पाहून व केलेल्या धाडसाचे कौतुक करून डॉ.योगेश चौधरी यांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा सहकार्य केले.

अर्थिक परीस्थिती हालाखीची
शहरातील विखरण रस्त्यावरील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील रहिवाशी असलेल्या हिरालाल नाईक या पंचावन्न वर्षीय आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंब प्रमुखास दोन महिन्यांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यांना दवाखाण्यात नेले असता तज्ञ डॉक्टरांकडून घशात शिट्टी टाकून श्वसनमार्ग मोकळा करण्याचे सांगण्यात आले. मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तसेच आजाराविषयीचे अज्ञान व औषधोपचारासाठी नसलेली पुरेशी माहिती यामुळे गरीब आदिवासी कुटुंबासमोर मोठी समस्या उभी राहिली पत्नी आशाबाई नाईक व मुलगी शालूबाई यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले. दवाखान्यातून निराश मनाने घरी परतलेल्या आदिवासी परिवाराला युवक कार्यकर्ते अण्णा पाटील, राजु चौधरी, माधव माळी यांनी धीर देऊन तुम्ही काहीही काळजी करू नका असे सांगितले. सर्व युवा कार्यकर्त्यांनी सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ.नरेंद्र ठाकुर यांचेशी संपर्क साधुन आदिवासी कुटुंबावर आलेल्या संकटाची माहिती दिल्यानंतर त्यांनी या कुटूंबास मानसिक आधार दिला. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ महाजन व त्यांच्या युवक सहकार्‍यांनी धीर देवून औषोधोपचारासाठी प्रयत्न सुरु केले.

मायलेकीचा झाला सत्कार
अशिक्षित असलेल्या आदिवासी माया-लेकींच्या संघर्षाला सलाम करून सुखकर्ता फाऊंडेशनच्या प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्षा डॉ.गीतांजली ठाकुर यांच्याहस्ते माय – लेकींना आर्थिक मदत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. युवा नेते प्रमोद महाजन अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकुर यांनी कॅन्सर या आजाराविषयी कोणतीही भीती न बाळगता लवकर निदान व उपचार केल्यास या आजारावर मात करू शकतो हे आदिवासी कुटुंबाने सिद्ध केल्याचे सांगितले. यावेळी वामन मराठे, रवी मराठे, दिनेश पाटील, भरत महाजन, परेश माळी, प्रवीण चौधरी, विक्की मराठे, समाधान महाजन यांचेसह नागरिक उपस्थित होते.