नागरीकत्व विधेयकाला पाठिंब्यासाठी यावल शहरात विराट मोर्चा : 150 फुटांच्या तिरंगा ध्वजावर नागरीकांकडून फुलांची उधळण : रावेरात राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे निघाली रॅली
भुसावळ : भारत सरकारच्या वतीने पारीत करण्यात आलेल्या सीएबी (कॅब) या नागरीकता संशोधन विधेयकाच्या समर्थनात गुरुवारी यावल शहरातून भव्य असा मोर्चा काढण्यात आला तर राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे काढण्यात आलेल्या 150 फुटांच्या भव्य तिरंग्या रॅलीतील ध्वजावर नागरीकांनी फुलांची उधळण केली तसेच रावेर शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे नागरीकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. दरम्यान, भुसावळात मात्र भारत सरकारने नागरीकत्व कायद्यात केलेली दुरूस्ती रद्द करण्यासह एनआरसी कायदा लागू न करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी सकाळी 11 वाजता रजा टॉवरपासून संविधान बचाओ समितीतर्फे प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्यांतर्फे प्रांताधिकार्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. मोर्चात सुमारे चार हजारापर्यत मोर्चेकरी होते.
भुसावळात मोर्चामुळे वाहतूक थांबवली
गुरुवारी सकाळी 11 वाजता रजा टॉवर चौकातून मेार्चाला सुरूवात झाली. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मोर्चाच्या पार्श्वभुमीवर या परीसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली तर रस्त्यावर उभ्या राहणार्या हात गाड्या हटविण्यात आल्या होत्या. मोर्चा मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यावेळी संविधान बचाओ समितीचे सदस्य हाजी सलीम चुडीवाले, मनव्वर खान, एमआयएमचे फिरोज शेख, पीआरपीचे जगन सोनवणे, साबीर शेख रोशन, दानिश पटेल, साजीद बागवान, निळकंठ फालक, अशरफ कुरेशी, अॅड. एहतेशाम मलिक, जे.बी. कोटेचा, योगेद्रसिंह पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मोर्चात तिरंगा झेंडा व निळा झेंडा मिरविण्यात आला.
कायदा रद्द करण्याची मागणी
रजा टॉवर चौकात जमा झालेल्या मोर्चेकर्यांना मौलाना इम्रान (नाशिक) आणि जगन सोनवणे, एमआयएमचे फिरोज शेख यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द झाला पाहीजे, जोपर्यत कायदा रद्द होत नाही, तोपर्यत आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चेकर्यांच्या मागण्या
नागरीकत्व दुरूस्ती कायद्याचा प्रस्ताव केद्रीय मंत्रीमंडळाने पाठवून त्यावर राष्ट्रपती यांनी स्वाक्षरी केल्याने हा कायदा लागू झाला असून तो जातीच्या आधारावर प्रेरीत आहे. हा कायदा संविधानाचे कलम 14(अ) आणि 15 (अ) यांचे उल्लंघण करीत आहे. या कायद्याने देशाची अखंडता आणि एकता संपणार आहे. यासाठी या कायद्याला विरोध असून एनआरसी कायदा हा काळा कायदा असून तो कायदा सुध्दा लागू करू नये, अशी मागणी करण्यात आले.
सत्ताधारी भाजपचे गटनेताही मोर्चात सहभागी
भाजप सरकारनेच नागरीकत्व कायद्यात दुरुस्ती केली असून या कायद्याच्या विरूध्द काढण्यात आलेल्या मोर्चात पालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेता मुन्ना इब्राहीम तेली यांचा विशेष सहभाग होता. मोर्चाच्या पार्श्वभुमीवर डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह दुय्यम अधिकारी, सुमारे 100 पोलिस कर्मचारी 50 होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. निवेदन देतांना फक्त शिष्ठ मंडळाच्या पदाधिकार्यांनाच प्रांताधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात आला.
यावलमध्ये नागरीकता संशोधन कायदा समर्थनार्थ मोर्चा
यावल- भारत सरकारच्या वतीने पारीत करण्यात आलेल्या सीएबी (कॅब) या नागरीकता संशोधन विधेयकाच्या समर्थनात गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मार्चात मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग होता. राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने गुरुवारी सकाळी 11 वाजता बोरावल गेट परीसरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चेकर्यांनी वंदे मातरमसह विविध घोषणा दिल्याने शहर दणाणले. स्वतःला थोर विचारवादी समजणारे या कायद्याच्या विरोधात जावुन देशात अराजकता माजाविण्याचे काम करीत असून देशातील काही संघटना या सीएबी नागरीकत्व संशोधन कायद्याच्या बद्दल देशवासीयांमध्ये अर्धवट व चुकीची माहिती पसरवून देशात मोठ्या प्रमाणाबर हिंसाचार करण्यात येत आहे. देशात अशा प्रकारे हिंसाचार पसरविणार्या व्यक्ती व संघटनांवर शासनाने योग्य ती चौकशी करून गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन यावल येथील निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना देण्यात आले.
यांचा मोर्चात सहभाग
यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे आयोजन राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी माजी आमदार हरीभाऊ जावळे, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, माजी उपसभापती राकेश वसंत फेगडे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र वामन कोल्हे, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, विलास चौधरी, माजी जिल्हा परीषद सदस्य हर्षल गोविंदा पाटील, जिल्हा परीषद सदस्या सविता अतुल भालेराव, मसाकाचे चेअरमन शरद जीवराम महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
रावेरात नागरीकत्व कायद्याला समर्थन : राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे रॅली
रावेर- सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रावेरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी तहसील प्रशासनाला पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने संसद भवनात सुधारीत नागरीकत्व कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर देशभरात विविध निषेध मोर्चे व आंदोलने करण्यात येऊन या कायद्याला विरोध दर्शविला जात आहे. या कायद्याला समर्थन देण्यासाठी रावेर शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या माध्यमातून राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गुरुवारी छोरीया मार्केटमधून समर्थन रॅलीला सुरुवातझाली. रॅलीमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी रावेर शहरातील 24 विविध संघटनांनी या रॅलीला आपला पाठिंबा दर्शविला. जामनेर येथील माजी संघटमंत्री मयूर पाटील यांनी मार्गदर्शन करील सीएए कायद्याची माहिती दिली व नायब तहसीलदार कविता देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
रॅलीत यांची होती उपस्थिती
यावेळी रॅली दरम्यान खासदार रक्षा खडसे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, महेश पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, उमेश महाजन, भास्कर महाजन, यशवंत दलाल, अॅड.लक्ष्मण शिंदे, अमोल पाटील, अॅड.सुरज चौधरी, पप्पू चौधरी, संदीप सावळे, प्रल्हाद पाटील, राजेश शिंदे, तुषार महाजन, दिलीप पाटील, सुरेश शिंदे, पिंटू महाजन, चंद्रकांत माळी, उमेश महाजन, गोपाळ शिंदे, कालू बारी, संदीप महाजन, अजय महाजन, किरण महाजन, डॉ.अनंत अकोले, गणेश शिंदे, युवराज माळी यांच्यासह मोठ्या संखेने विविध हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.