मुंबई । गेल्या रविवारी झालेल्या ज्येष्ठ कॅरम संघटक व ज्युनियर राष्ट्रीय खेळाडू दशरथ येलवे स्मृती 27 व्या मुंबई जिल्हा मुलींच्या कॅडेट, सबज्युनियर,ज्युनियर आणि युथ गट अजिंक्यपद व निवड चाचणी कॅरम स्पर्धेच्या मुली विजेत्यांचा आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे विशेष सन्मान केला जाणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ व स्पोर्ट्स असोशिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन यांच्या सहकार्याने सदर मुलीमधील विजेत्यांना 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, जी.डी. आंबेकर मार्ग, परेल मुंबई-12 येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू महेंद्र तांबे, कॅरमप्रेमी गोविंदराव मोहिते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.
यावेळी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शिक्षक दिनानिमित्त जाहीर झालेला आयडियल क्रीडा शिक्षक पुरस्कार डॉ. ओमप्रकाश जोशी यांना दिला जाणार आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीकडे विजेत्या स्पर्धकाची नांवे उपलब्ध नसल्यामुळे तसेच 23 सप्टेंबर रोजी सदर खेळाडू नाशिक येथील राज्य कॅरम स्पर्धेत खेळणार असल्याचे कळल्यामुळे मुलीना प्रोत्साहन देण्यासाठी अल्प वेळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी विजेत्या संबंधित मुलीनी सदर सन्मान समारंभास उपस्थित राहण्याची विनंती आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पत्रकाद्वारे केली आहे.