भुसावळ। सध्या प्लॉस्टीक हे पर्यावरणासाठी अतिशय घातक पदार्थ ठरत असून प्लॉस्टिक एक समस्या निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर शासनाने बंदी घातली आहे. मात्र शहरात या कॅरीबॅगचा वापर आणि विक्री खुलेआम होत आहे. पालिकेने सुरुवातीच्या काळात कॅरीबॅगचा वापर आणि विक्री करणार्यांवर कारवाई केली. मात्र, गेल्या वर्षभरात याप्रकारे एकही कारवाई झाल्याने कॅरीबॅगचा वापर वाढला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी शहरातील कॅरीबॅग विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळले आहे. यामुळे शासनाने कॅरीबॅगवर लादलेली बंदी आता केवळ नावापुरती राहिली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना कर्मचार्यांना तपासणीचे कारवाई करण्याचे अधिकार असतानाही त्यांच्याकडून या प्रकाराकडे कानाडोळा केला जातो. अधिकार्यांच्या या उदासीनतेमुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वत्र होत असल्याने प्रशासनाची बंदी केवळ कागदापुरतीच उरली आहे. त्याचा परिणाम या अभियानावर होत असून प्लॉस्टिकचा वापर घातक ठरु पाहत आहे.
प्लॉस्टिक हा पदार्थ विघटनशील नसल्यामुळे प्लॉस्टीकच्या पिशव्यांचा केवळ एक वेळ वापर करुन त्या फेकून दिल्या जातात. मात्र त्या सहजासहशी विघटीत होत नसल्यामुळे शहरात जागो जागी प्लास्टीक कचर्याचे ढिग दृष्टीस पडत आहे. काही जण या कचर्याला जाळत असून यातून अतिशय उग्र गंध असलेली धूर निघत असून हा नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वेळीच शहरात होत असलेली प्लास्टीक पिशव्यांची विक्री थांबवून अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.