कॅरोलिना मारिनचा सायना नेहवाललाही दणका

0

हैदराबाद : हैदराबाद हंटर्सकडून खेळणार्‍या स्पेनची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मारिनने प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) दुसर्‍या दिवशी सायना नेहवाललादेखील दणका दिला. अवध वॉरियर्सकडून खेळणारी सायना 15-14 आणि 11-5 अशी पराभूत झाली. मारिनने रविवारी झालेल्या पहिल्या लढतीत पी. व्ही. सिंधूचादेखील पराभव केला होता. मारिनच्या या विजयाच्या बळावर हैदराबाद हंटर्सने चेन्नईवर 4-3 अशी मात केली होती.

ब्लास्टर्सचा थरारक विजय
तत्पूर्वी, आणखी एका लढतीत बंगळूरु ब्लास्टर्स संघाने दिल्ली एसर्स संघावर 4-3 असा थरारक विजय साजरा केला. हैदराबादच्या गचीबोवली इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बंगळूरुच्या चेऊन गान यी हिने दिल्लीच्या तन्वी लाडला 11-9, 6-11, 11-2 अशा फरकाने नमवित विजय नोंदवला. जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या यी ला भारताच्या तन्वी लाडने चांगली टक्कर दिली. दुसर्‍या गेममध्ये तिने विजय नोंदवत सामना बरोबरीत आणला; पण शेवटच्या गेममध्ये गान यी ने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

सरळ गेममध्ये विजय
फॉर्म सुटलेल्या सायनाच्या विरोधात मारीन अगदी सहज खेळत होती. तिने सरळ सेटमध्ये तिचा पराभव केला. जोर्गेनसेन व अ‍ॅक्सेलसेन यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये जोर्गेनसेन याने 11-9, 11-9 अशा सरळ गेममध्ये विजय मिळवला. बंगळूरु संघाच्या को सुंग व सिकी रेड्डी जोडीने दिल्लीच्या ज्वाला गुट्टा व ब्लादिमीर इवानोव जोडीला 11-6, 11-6 असा विजय मिळवला. या सामन्यानंतर संघ 1-1 गुणांवर होते.