कॅलिफोर्नियातील 1 लाख 80 हजार नागरिकांचे स्थलांतर

0

वॉशिंग्टन । अमेरिकेमधील सर्वांत उंचावरील धरण असलेल्या ओरव्हिल डॅमच्या सांडव्यामधून धोकादायकरीत्या पाण्याची गळती होत असल्याने उत्तर कॅलिफोर्नियामधील सुमारे 1,80,000 नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भागात झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर साडेसातशे फुटांपेक्षाही जास्त उंची असलेल्या या धरणाचा सांडवा तकलादू झाल्याचे निदर्शनास आले होते. हा सांडवा कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. काही वर्षांच्या तीव्र दुष्काळानंतर या भागात झालेल्या पाऊस व हिमपातामुळे हे धरण काठोकाठ भरले आहे. या धरणाच्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हे धरण कॅलिफोर्निया प्रांताची राजधानी असलेल्या सॅक्रामेंटो शहराच्या उत्तरेस सुमारे 105 किमी अंतरावर आहे. सध्या या धरणामधील पाण्याचा दबाव कमी करण्यासाठी धरणामधून लाख क्युबिक फूट वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हे संपूर्ण धरण फुटण्याचा धोका नसला, तरी दुर्दैवी घटना टाळण्यासाठी नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.