कॅशलेस तिकीट खरेदीस प्रतिसाद

0

 भुसावळ : पंंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडिया अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात पहिल्या टप्प्यात 31 स्थानकांवर 40 आरक्षण कार्यालयात स्वाईप मशिन लावण्यात येणार आहे. त्यापैकी 31 मशिन बसविण्यात आल्या आहेत. रेल्वेचे अधिकारी याबद्दल प्रवाशांना नियमितपणे माहिती करुन देत असल्यामुळे यास प्रवाशांचा देखील प्रतिसाद मिळत आहे. याद्वारे आरक्षित तिकीटांची नोंदणी करण्यात येत आहे. सोमवार 19 रोजी डिआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी देखील रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकीजवळ थांबून प्रवाशांना या मशिनच्या कार्यपध्दतीबद्दल मार्गदर्शन करुन कॅशलेस तिकीट नोंदणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी एसडीएम मिश्रा, सीआरएस एन.एम. पुरोहित, एसडीई एम. जे. निमजे, स्टेशन व्यवस्थापक आर.के. कुठार आदी अधिकारी उपस्थित होते.

158 स्वाईप मशिन लावणार
शासनाने काळ्या पैशाविरोधात अभियान सुरु केले आहे. याअंतर्गत चलनातील बदल करुन आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी कॅशलेस व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यादृष्टीने आता रेल्वे स्थानकावरीवल आरक्षण खिडकी तसेच खाद्य पदार्थांच्या दुकानांवर स्वाईप मशिन बसविण्यात आल्या आाहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार करुन एकूण 158 स्वाईप मशिन लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासी डेबिट व क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून तिकिटांची खरेदी करु शकतील.

8 ते 10 टक्क्यांनी होतेय आरक्षित तिकीटांची नोंदणी
या अभियानांतर्गत पहिले स्वाईप मशिन 12 रोजी देवळाली स्टेशनवर, 13 रोजी नाशिक रोड, नाशिक सिटी, नांदुरा, खामगाव, शेगाव, अकोला, अमरावती आणि यवतमाळ स्थानकांवर लावण्यात आले आहे. यामध्ये नाशिक रोड येथे तीन मशिन, नाशिक सिटी दोन, निफाड एक, लासलगाव एक, मनमाड एक, नांदगाव एक, चाळीसगाव एक, धुळे एक, पाचोरा एक, जामनेर एक, जळगाव दोन, भुसावळ तीन, मलकापूर एक, बोदवड एक, नांदुरा एक, खामगाव एक, बुलढाणा एक, शेगाव एक, अकोला दोन, मुर्तिजापूर एक, बडनेरा एक, अमरावती दोन, यवतमाळ एक, कारंजा एक, अचलपूर एक, खंडवा दोन, नेपानगर एक, बर्‍हाणपूर एक, रावेर एक, सावदा एक, देवळाली एक याप्रमाणे मशिन बसविण्यात आले आहे. 16 डिसेंबर रोजी रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकीवर स्वाईप मशिन बसविण्यात आली असून याद्वारे जवळपास 8 ते 10 टक्के तिकीट नोंदणी करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. यात 16 रोजी 22 हजार 915 रुपये, 17 रोजी 20 हजार 305 तर 18 रोजी 28 हजार 735 रुपयांची तिकीट नोंदणी करण्यात आली असून यास प्रवाशांचा प्रतिसाद लाभत असल्यामुळे मशिनच्या वापरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.