पुणे । महापालिकेतील कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि अनुदानित वस्तू खरेदीला होणार विलंब टाळण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याकरीता 42 लाख 50 हजार 400 रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. या कामासाठी निविदा काढल्यावर केवळ बेंचमार्फ आयटी सोल्युशन या एकमेव संस्थेने सहभाग घेतल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यासाठी ज्याप्रमाणे डीबीटी कार्डमार्फत देण्याचा उपक्रम महापालिकेने राबवला. दरवर्षी महापालिकेतील विविध श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचार्यांना सुमारे 432 विविध प्रकारचे साहित्य महापालिकेतर्फे दिले जाते. महापालिकेच्या भांडार विभागाकडून निविदा प्रक्रियेद्वारे हे साहित्य मागवण्यात येते. याच धर्तीवर कर्मचार्यांनाही त्यांचे साहित्य प्रशासनाने पुरवण्यापेक्षा त्याचे पैसे थेट खात्यात जमा केले जाणार आहेत. या प्रक्रियेची अंमलबजावणी थेट लाभ हस्तांतरण डीबीटीमार्फत केली जाणार आहे. हे पैसे जमा करताना लाभार्थ्यांचा आधार क्रमांक त्याच्या बँक खात्याशी जोडला जाणार आहे. त्यामुळे कल्याणकारी योजनांचे लाभ थेट आणि विनाविलंब होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या सर्व अनुदानावर होणार्या खर्चाचा ताळमेळ राहावा यासाठी बेनिफिट मॅनेजमेंट प्रणाली विकसित केली जाणार आहे. संबंधित प्रणाली विकसित करण्यासाठी सुमारे 42 लाखांचा खर्च होणार असून त्यासंबंधी येत्या बुधवारी स्थायी समितीत निर्णय घेतला जाणार आहे.