केंद्राचा निर्णय, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटतर्फे चौकशी
एटीएमच्या खडखडाटामागे कटकारस्थानाचा संशय
नवी दिल्ली : देशाच्या काही भागांत उद्भवलेली रोकड टंचाई आणि त्यावरून होणार्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला जाग आली असून, ही टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, कोणत्या एटीएम केंद्रातून कोणी आणि किती रोकड काढली आणि त्यामागचे कारण काय याची चौकशी करण्याचा अजब निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटतर्फे ही चौकशी केली जाणार आहे. रोकड टंचाई हे कुणाचे तरी कारस्थान असावे, असा संशय केंद्र सरकारला आल्याने ही चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दर महिन्याला अहवाल सादर करा
मागील काही दिवसांपासून देशाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा तुटवडा आहे. अनेक ठिकाणी एटीएममध्ये खडखडाट आहे. यामुळे केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेवर टीकेची झोड उठली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणी खुलासा केल्यानंतरही टीकेचा भडिमार सुरूच आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. एटीएम केंद्रांवर पुरेशी रोकड पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. भविष्यात ही समस्या भेडसावू नये यासाठी उपाय केले जात आहेत. आरबीआयच्या सर्व प्रांतीय कार्यालयांनी रोख रकमेची मागणी व पुरवठ्याचा अंदाज घेऊन दर महिन्याला अहवाल सादर करावा, असे आदेशही दिले आहेत.
एवढी रक्कम काढण्याचे कारण काय?
देशातील 2,166 एटीएम केंद्रांतून अचानक मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम काढली गेल्याचे निदर्शनास आले आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट या सर्व एटीएम केंद्रांची चौकशी करणार आहे. या एटीएममधून नेमकी कुणी रक्कम काढली? इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्याचे कारण काय?, याची माहिती घेतली जाणार आहे. या चौकशीत इन्कम टॅक्स विभाग फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटला मदत करणार आहे. एटीएमच्या खडखडाटामागे कटकारस्थानाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही कारणांमुळे रोख रकमेची मागणी वाढलेली असू शकते. परंतु, एटीएममध्ये पैसेच मिळू नयेत यामागे काहीतरी कारस्थान आहे, असा संशय केंद्र सरकारला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वसाधारणपणे महिन्याला 20 हजार कोटींची रोकड काढली जाते.