केंद्राचा अधिकारी सिंहगडावर नागडा बसला!

0

शिवप्रेमी संघटनांनी रंगेहाथ पकडला, गुन्हा दाखल

पुणे : सिंहगडावरील दूरदर्शन ट्रान्समिशन केंद्राच्या कार्यालयातील इमारतीबाहेर सन बाथ घेण्यासाठी नग्न अवस्थेत बसलेल्या केंद्रातील वरिष्ठ अधिकारी लतीफ सय्यद (55) यास शिवप्रेमी संघटनांनी रविवारी सकाळी पकडले. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यामध्ये अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या केंद्रात होणार्‍या दारूपार्ट्या बंद करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.

व्हिडिओदेखील पोलिसांना दाखवला
शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते रविवारी सकाळी दूरदर्शन केंद्राच्या बाहेरून जात असताना लतीफ सय्यद नग्न अवस्थेत खुर्चीत बसल्याचे दिसले. कार्यकर्त्यांनी चौकशी केल्यावर ड जीवनसत्त्व घेण्यासाठी सन बाथ घेत असल्याचे त्याने उत्तर दिले. त्यानंतर त्याने पळ काढला. कार्यकर्त्यांनी त्याला तत्काळ पकडून हवेली पोलिसांच्या ताब्यात दिले. सय्यद याच्या या कृत्याचा व्हिडिओदेखील बनविण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आणि महिलांना लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्यामुळे भारतीय दंड संहिता 295 (अ) आणि 509 नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूपार्ट्या बंद करण्याची मागणी
दुर्गप्रेमी पोटतिडकीने आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मेहनत घेत असताना अशा प्रकारांमुळे गडाचे पावित्र्य भंग होते. त्यामुळे दूरदर्शन कार्यालयाची चौकशी व्हावी, अशी मागणी रायगड आणि राजगड संवर्धन मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दूरदर्शन केंद्रावर सध्या बेकायदा अनेक उद्योग सुरू असल्याचा आरोप शिवप्रेमी संघटनांनी केला आहे. खासगी मालमत्तेसारखा दूरदर्शन केंद्राच्या कार्यालयाचा वापर सुरू आहे. केंद्राच्या आवारात सर्रास दारूच्या पार्ट्या होतात आणि गडाच्या पावित्र्याचे हनन होत असल्याचे दुर्गप्रमींचे म्हणणे आहे.