केंद्रातील मोदींचे सरकार 2019 पूर्वीच कोसळेल

0

पाटणा । विविध कारणांमुळे चौकशीच्या फेर्‍यात अडकलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना हे सरकार 2019 पूर्वीच कोसळेल, असे भाकीत वर्तवले आहे. लालू प्रसाद यादव यांनी शेतकर्‍यांच्या समस्या आणि लष्करातील जवानांना भेडसावणार्‍या अडचणींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना हे सरकार विरोधकांची गळचेपी करत असल्याचा आरोप केला आहे.

चारा घोटाळाप्रकरणी सीबीआय न्यायालयात हजर होण्यासाठी रांचीमध्ये दाखल झालेल्या लालूप्रसाद यादव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या आणि लष्कराच्या जवानांच्या परिस्थितीच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. मध्य प्रदेशात आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात 5 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. याविषयी बोलताना त्यांनी मोदींना लक्ष्य केले. एक तर शेतकर्‍यांची हत्या केली जात आहे, तर दुसरीकडे शेतकरी स्वतःच आत्महत्या करत आहे. मोदी सरकारच्या काळात आतापर्यंत 12 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे, असे लालूप्रसाद म्हणाले. मोदी 56 इंचाची छाती असल्याचे म्हणत होते. कुठे गेली 56 इंचांची छाती? अच्छे दिन कधी येणार, असा सवालही त्यांनी केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच मोदी सरकार पडेल, असे भाकीतही त्यांनी केले.

सरकारविरोधात बोलणार्‍यांचा आवाज दाबला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मोदी सरकारविरोधात विरोधकांची एकजूट करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी गांधी मैदानात रॅली काढणार आहे. या रॅलीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसप प्रमुख मायावती यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत. त्यांना या रॅलीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे, अशी माहितीही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी दिली.