केंद्रात पूर्नवसन करा, राणेंच्या भाजप प्रवेशातील अट

0

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज अचानक दिल्लीला रवाना झाल्याने त्यांच्या पक्षांतराच्या बातम्यांना पून्हा वेग आला आहे. राणे हे भाजपच्या वाटेवर असून, राज्यात नव्हे तर केंद्रात पूर्नवसन करा, अशी अट राणे यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे घातली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली.

राज्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस हे नारायण राणे यांना ज्युनिअर आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रीमंडळात राणे काम करण्यास इच्छूक नसल्याचे समजते. केंद्रात काम करण्याची इच्छा राणे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. त्याचबरोबर राज्यात त्यांचे सुपूत्र नितेश राणे हे आमदार आहेत. तर निलेश राणे यांनी आठवडाभरापूर्वीच काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नितेश यांना राज्यमंत्री मंडळात स्थान मिळावं आणि निलेश यांचे पून्हा राजकीय पूर्नवसन करावे अशीही दुसरी अट राणे यांची असल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांच्या पक्षांतराच्या बातम्यांना चांगलाच वेग आला आहे. काँग्रेसचे नेते या बातम्या पेरीत असल्याचा आरोप करीत राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर तोफ डागली होती. राणे यांनी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे वक्तव्य करीत “भूकंप सांगून येत नाही तो अचानक होतो” असेही स्पष्ट संकेत दिले होते. तर दोन दिवसांपूर्वीच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही राणे हे प्रत्येक पक्षाला हव असणार व्यक्तीमत्व अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राणे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने भाजप प्रवेशाच्या चर्चाना अधिकच वेग आला आहे. राणे हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राणे यांच्यातील विस्तव जात नाही. सध्या काँग्रेसची अवस्थाही बिकट आहे. तर नुकत्याच झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना दोन अडीच वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे राणे हे भाजपचे कमळ हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या अटी मान्य केल्या जातात हेच पाहवे लागणार आहे.