केंद्रात लवकरच खांदेपालट!

0

नवी दिल्ली : या आठवड्यात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता दिल्लीस्थित वरिष्ठ राजकीय सूत्राने वर्तविली आहे. भाजपच्या अनेक निष्क्रिय मंत्र्यांना हटविले जाणार असून, त्यात प्रकाश जावडेकरांचाही समावेश असेल, असे सूत्र म्हणाले. नुकतेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रीय जनता दल (संयुक्त)ला केंद्रात मंत्रिपद देण्यात येण्याची शक्यता असून, तामिळनाडूत पुन्हा एकत्र आलेल्या अन्ना द्रमुक (एआयडीएमके) पक्षाचाही एनडीएत समावेश होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनाही केंद्रात मंत्रिपद दिले जाणार आहे. सद्या जोरदार अटकळ बांधली जात असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही केंद्रात मंत्री केले जाणार असल्याची दाट शक्यता सूत्राने वर्तविली. फडणवीस यांनी महाराष्ट्रात चांगले काम केल्याची बक्षिसी त्यांना दिली जाणार आहे. तद्वतच महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री बनविण्याच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. दरम्यान, मोदी-शहांच्या बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारही एनडीएत सहभागी होण्याची दाट शक्यता सूत्राने वर्तविली. राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदे देण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठस्तरीय नेतृत्वाचे दर्शविली होती.

निष्क्रिय भाजपमंत्र्यांना मिळणार डच्चू!
तामिळनाडूत सोमवारी महत्वपूर्ण घटना घडल्यात. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीसामी व ओ. पन्नीरसेल्वम यांच्या गटात पुन्हा एकदा ऐक्य झाले आहे. पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले असून, त्यांच्याकडे अर्थमंत्रालय व शहरी विकास मंत्रालयदेखील सोपविण्यात आले आहे. या दोघांच्या एकत्र येण्याने आता पुन्हा एकसंघ अन्ना द्रमुक (एआयडीएमके) पक्ष अस्तित्वात आला आहे. दरम्यान, हा पक्ष केंद्रातील एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचेही सूत्राने सांगितले. त्यामुळे त्यांना केंद्रातही मंत्रिपद दिले जाणार आहे. पुण्याच्या प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक खासदारांना आपल्या कामाची चुणूक दाखविता आली नाही. त्यामुळे भाजपच्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येऊन पक्षाच्या कामाला जुंपले जाणार आहे. त्यांच्या जागी जेडीयू, एआयडीएमके यांच्या खासदारांना मंत्रिपद दिले जाणार आहे. 19 ऑगस्टरोजी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, हा पक्ष एनडीएत सहभागी झाला असल्याने त्यांचे मंत्रिपद निश्चित आहे.

अमित शहांकडून अंतिम यादी तयार!
भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे उद्या चेन्नईला रवाना होणार होते. परंतु, त्यांना राजधानी दिल्लीतच थांबविण्यात आले होते. शहा हे ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर चर्चा करत होते. त्यांनी अंतिम यादी निश्चित केली असून, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवली होती, अशी माहितीही सूत्राने दिली. यापूर्वी 18 ते 20 ऑगस्टदरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलाचे निश्चित झाले होते. परंतु, राष्ट्रपती निवडणुकीमुळे ही तारीख टळली होती. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ फेरबदल निश्चित करण्यात आला आहे. दोन-चार दिवसांत बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयूप्रमुख नीतीश कुमार हे दिल्लीला येणार असून, ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. कुणाला केंद्रात मंत्री करावे, याबाबत हे दोन नेते चर्चा करणार आहेत. शिवाय, एआयडीएमकेच्या एकत्रिकरणामुळे हा पक्षदेखील एनडीएत येणार असून, त्यांच्याशी अमित शहा चर्चा करणार आहेत. त्यांचे 50 खासदार संसदेत असल्याने त्यांना चार मंत्रिपदे देण्याचे निश्चित झाले आहे. तर जेडीयूला दोन मंत्रिपदे दिली जाणार असल्याचेही सूत्र म्हणाले.

शरद पवारही एनडीएत?
दिल्लीस्थित सूत्राच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पॉवरफुल नेते शरद पवार यांनाही एनडीएत सहभागी करून घेण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने हालचाली गतिमान केल्या आहेत. बिहारमध्ये करण्यात आलेल्या राजकीय प्रयोगाची पुनर्रावृत्ती महाराष्ट्रातही करण्याचे भाजप नेतृत्वाच्या डोक्यात घोळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एनडीएमध्ये सहभागी करून पवारांना वरिष्ठ मंत्रिपद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. तर शिवसेनेसोबत काडीमोड घेण्यासाठी भाजपच्या एका गटाचा दबाव वाढला आहे. डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विदेश दौर्‍यावर जाणार असून, तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या खांदेपालटला मूर्तरुप दिले जाणार आहे. त्यानंतर पुन्हा पितृपंधरवडा सुरु होत असल्याने हा खांदेपालट याच महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचेही सूत्र म्हणाले.