केंद्राने आमची देणी द्यावी त्यांच्या मदतीची आवश्यकता नाही: मुख्यमंत्री

0

मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. ऐन काढणी-कापणीला आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान आज १९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरहून दौरा सुरु केला आहे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीपासून दौरा करत आहेत. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारने जबाबदारी न झटकता आणि केंद्राची वाट न पाहता तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर देखील टीका केली आहे. दरम्यान यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकारच्या मदतीची आम्ही वाट पाहणार नाही परंतु केंद्राने आमची देणी वेळेवर द्यावे, आमची देणी दिली तर केंद्राकडून मदतीचीही आम्हाला आवश्यकता नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

विरोधकांनी केंद्र आणि राज्य असा भेदभाव करू नये. एकेकाळी आताचे विरोधक सत्तेत होते. त्यांनीही महाराष्ट्रात राज्य केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्र, राज्य असा भेदभाव करू नये असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

मदतीच्या मुद्द्यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.

परतीच्या पावसामुळे शेतीचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामा न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.