केंद्राने जाहिरातींवर साडेतीन हजार कोटी उधळले!

0

नवी दिल्ली : साडेतीन वर्षात मोदी सरकारने केवळ जाहिरातबाजीवर तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये खर्च केले आहेत. ग्रेटर नोएडातील सामाजिक कार्यकर्ते रामवीर तन्वर यांनी यासंबंधीची माहिती ही माहिती अधिकारात मागवली होती. यातून मोदी सरकारची जनतेच्या पैशातून सुरू असलेली कोट्यवधी रूपयांची जाहिरातबाजी उघड झाली आहे.

काही मंत्रालयांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त खर्च
केंद्राच्या माहितीनुसार, सरकारने इलेक्ट्रॉनिक मीडिया, कम्युनिटी रेडिओ, एसएमएस यावर 1 हजार 656 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर प्रिंट मीडियातील जाहिरातींवर केंद्राने 1 हजार 698 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच होर्डिंग्स, पोस्टर्स, बुकलेट, कॅलेंडर्स यावर 399 कोटी रुपये खर्च केले आहेत. मोदी सरकारने जाहिरातींवर खर्च केलेला पैसा हा काही मंत्रालयांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मन की बात, धन की बात
जून 2014 ते ऑगस्ट 2016 अशा दोन वर्षात केंद्राने नरेंद्र मोदींच्या इमेज मेकओव्हरसाठी 1 हजार 100 कोटी रुपये खर्च केले. तर 2015 या एका वर्षात मन की बात कार्यक्रमाची पेपरमध्ये जाहिरात करण्यासाठी साडेआठ कोटी खर्च झाले आहेत.

आपवर टीका करणार्‍यांकडून उधळपट्टी
2015 मध्ये दिल्लीतल्या आम आदमी पक्षाने त्यांच्या सरकारच्या कामांची माहिती दिल्लीकरांना देण्यासाठी जाहिरातबाजीवर 529 कोटी रुपये खर्च केले होते. पण यावरुन काँग्रेस आणि भाजपने आपवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, मोदी सरकारनेही तीन वर्षात जाहिरातबाजीवर 3 हजार 755 कोटी रुपयांची उधळण केल्याने, ही जाहिरातबाजी भविष्यात मोदी सरकारला आणखी महागात पडणार असल्याचे दिसते.