नवी दिल्ली । केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवे यांना रात्री उशीरा नवी दिल्लीतील एस्म हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच त्यांनी एम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. अनिल माधव दवे यांच्या निधनाच्या वृत्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. अनिल दवे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यसभेचे खासदार असलेले अनिल दवे मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करत होते. अनिल दवे यांच्याकडे पर्यावरण, वन आणि हवामान बदल या खात्यांचा स्वतंत्र प्रभार होता. अनिल दवे यांच्या आकस्मिक निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या.
निगर्वी पर्यावरणवादी आपण गमावला
केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या निधनाने महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना देणारा साधा आणि निगर्वी पर्यावरणवादी आपण गमावला आहे, दवे यांच्या निधनाने आपणास मोठा धक्का बसला. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या निमित्ताने मी त्यांच्या सातत्याने संपर्कात होतो. त्यांनीही जातीने लक्ष घालून या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मंजुरी देण्याबाबत तातडीने कार्यवाही केली होती. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र कायमच स्मरणात ठेवेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे ते अभ्यासक होते.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री