केंद्रीय मंत्रिमंडळाची कर्मचार्यांना खूशखबर
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्ती वेतनधारकांना केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक खूशखबर दिली आहे. त्यांच्या महागाईभत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ केली असून, 1 जानेवारी 2018 पासून हा भत्ता लागू होणार आहे. लवकरच फरकाची रक्कमही त्यांच्या वेतनातून अदा केली जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख सेवानिवृत्त कर्मचार्यांना लाभ होणार आहे.
1 जानेवारीपासूनचा फरकही मिळणार
महागाई वाढल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून, महागाईच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी सायंकाळी मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात येत, 1 जानेवारी 2018 पासून तो देण्याचा निर्णय घेण्यात आला. वेतनावरील चलनवाढीचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता दिला जातो. सध्याचा महागाई भत्ता केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना किंवा निवृत्ती वेतनधारकांना मूळ वेतनाच्या प्रमाणात प्रमाणात दिला जात असून, हे प्रमाण 5 टक्के इतके आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित सूत्रानुसार महागाई भत्त्यातील ही वाढ झाली आहे.