केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये लवकरच होणार वाढ

0

नवी दिल्ली- वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमिवर केंद्र सरकार लवकरच आपल्या सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 58 लाख निवृत्तीवेतनधारकांना गोड बातमी देणार आहे. या सर्वांना मिळणार्‍या महागाई भत्त्यामध्ये 2 ते 4 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे अंदाजे एक कोटी जणांना फायदा होणार आहे. तर महागाई भत्त्यामध्ये होणारी ही वाढ 1 जानेवारी 2017 पासून लागू होणार आहे. मात्र केंद्रीय कर्मचारी संघाने या संभाव्य वाढीवर नाराजी व्यक्त केली आहे.

लवकरच होणार घोषणा
केंद्र सरकार 12 महिन्यांमधील महागाईची सरासरी काढून त्यानुसार महागाई भत्ता निश्चित करत असतं. यात दशांशच्या नंतरचे आकडे गृहित धरले जात नाहीत. म्हणजे 2.95 टक्के इतका महागाई दर असल्यास हा दर 2 टक्के इतकाच धरला जातो आणि त्या प्रमाणातच महागाई भत्तावाढ दिली जाते. कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ वेतनावर ही भत्तावाढ मिळत असते. या फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना 2 ते 4 टक्क्यांपर्यंत महागाई भत्तावाढ देण्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे. याबाबत येत्या काही दिवसांमध्येच घोषणा होण्याची शक्यता आहे.

कुट्टी यांची नाराजी
केंद्रीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष के. के. एन. कुट्टी यांनी ही वाढ अतिशय अल्प स्वरुपाची असल्याचे सांगत यावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांमध्ये किरकोळ वस्तूंच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्याच्या तुलनेमध्ये ही वाढ अत्यंत कमी आहे. महागाई वाढ मोजण्यासाठी औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय-डब्ल्यू) तपासला जातो. हा निर्देशांक महागाई भत्ता वाढवण्यासाठी ही पद्धत अधीकृत समजली जाते परंतु ही पद्धत अचूक नाही असे ते म्हणाले. मागील वर्षीदेखील महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली होती हे विशेष.