जळगाव – केंद्रातील अधिकाऱ्यांचे पथक राज्यात येणार असून 5 ते 7 डिसेंबर दरम्यान दुष्काळी भागाची पहाणी करणार आहे. यावर्षी पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे दुष्काळ निवारणासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यामध्ये वेगवेगळ्या केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक पाठवून पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही ५ आणि ६ डिसेंबर दरम्यान दुष्काळी परिस्थितीचा पाहणी जळगाव जिल्हा दौरा होणार आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी केंद्र शासनाने केंद्रीय कृषी विभाग, पाणीपुरवठा, निती आयोग, अन्न व पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव, संचालक दर्जाचे अधिकारी पाहणी करणार आहे. यासाठी हे पथक प्रथम ५ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे येणार असून यात श्रीमती एस. एन. छावेझा, ए.के.तिवारी, शालिनी सक्सेना, सुभाषचंद्र मीणा, एम.जे. टेंभुर्णे, विजय ठाकरे, मनीष चौधरी, एस.सी. शर्मा यांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील बैठकीनंतर तीन पथके वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन पाहणी करतील. एक पथक बुलडाणा, जळगाव, नाशिक जिल्ह्यात दौरा करणार आहे. हे पथक पिकांचे झालेले नुकसान, पाणीटंचाई व चारा परिस्थितीची पाहणी करणार आहे. या पथकासोबत जिल्हाधिकारी शुभांगी भारदे, एरंडोल प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आणि कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.