केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; निर्मला सीतारमण संरक्षण, पीयूष गोयल रेल्वेमंत्री!

0

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2019 वर लक्ष ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसर्‍यांदा विस्तार करत, चार कॅबिनेट मंत्र्यांसह नऊ राज्यमंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामील केले. निर्मला सीतारमण, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी आणि धमेंद्र प्रधान यांना राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली असून, मोदी मंत्रिमंडळाची संख्या आता 76 वर पोहोचली आहे. ज्यात 28 कॅबिनेट मंत्री आहेत. निर्मला सीतारमण यांच्याकडे देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, स्व. इंदिरा गांधी यांच्यानंतर त्या दुसर्‍या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. तर सुरेश प्रभू यांचा रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करत, रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आली. प्रभू आता वाणिज्य मंत्रालय हे दुय्यम खाते पाहणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक मंत्रिपद व जनता दल (संयुक्त)लाही दोन मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा होती. मोदींनी या दोन्ही पक्षांना ठेंगा दाखविला. त्यामुळे शिवसेनेने हा भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार होता, एनडीएचा नाही. एनडीएचा मृत्यू झाला आहे, त्यांचे अस्तित्व केवळ कागदावर उरले आहे, अशी जळजळीत टीका केली. तर नीतीशकुमारसारख्या पलटूरामला मोदींनी चांगलाच इंगा दाखविला, अशी टीका करत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नीतीशकुमारांना जोरदार चिमटा काढला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही केंद्रात प्रमोशन मिळण्याची शक्यता होती. त्यासंदर्भात गतआठवड्यात फडणवीस यांची दिल्लीत शहा-मोदी यांच्यासोबत चर्चाही झाली होती. परंतु, मोदींनी त्यांना राज्यातच ठेवणे पसंत केले. मुंबई व पुण्याचे माजी पोलिस आयुक्त राहिलेले सत्यपाल सिंह यांना राज्यमंत्रिपदी संधी मिळाली असून, त्यांच्याकडे शिक्षण खाते सोपविण्यात आले आहे. सिंह यांनी मुंबईत पोलिस आयुक्त असताना अंडरवर्ल्डचे कंबरडे तोडले होते. राजनाथ सिंह व अमित शहा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

लोकसभा निवडणुकीवर लक्ष
आगामी लोकसभा व काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवूनच भाजप अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. खासदार झालेले अमित शहा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी शक्यता होती. परंतु, मोदी-शहा यांनी धक्कातंत्राचा वापर करत चौघांना बढती तर अन्य नऊ नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात संधी दिली. उत्तरप्रदेशवर लक्ष केंद्रीत केल्याने या राज्यातून सर्वाधिक तीन मंत्री देण्यात आले. त्यात दोन नव्यांचा समावेश आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट तर माजी आयपीएस अधिकारी सत्यपाल सिंह व शिवप्रकाश शुक्ल यांना राज्यमंत्री बनविण्यात आलेले आहे. सत्यपाल सिंह हे जाट समाजाचे असून, जाटांना राजकीय प्रतिनिधीत्व देण्याच्या हेतून सिंह यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्तपदावरून राजीनामा देऊन ते राजकारणात उतरले आहेत. कलराज मिश्र यांच्या जागी शुक्ल यांना संधी देऊन ब्राम्हण समाजाला जवळ करण्याचा प्रयत्नही शहा-मोदी जोडीने केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा हा पहिलाच शपथविधी सोहळा होता. त्यांनी सर्वप्रथम बढती मिळालेल्या मंत्र्यांना शपथ दिली. त्यात धमेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारमण यांचा समावेश होता. त्यानंतर शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, वीरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंह, हरदीपसिंह पुरी, गजेंद्रसिंह शेखावत, सत्यपाल सिंह व अल्फोंस के. जे. यांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. या सोहळ्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, भाजप अध्यक्ष अमित शहा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मोदी मंत्रिमंडळात समावेश झालेले मंत्री
कॅबिनेट मंत्री
1. निर्मला सीतारमण : संरक्षणमंत्री
2. धर्मेंद्र प्रधान : कौशल्य विकास व पेट्रोलियम मंत्रालय
3. पीयूष गोयल : रेल्वे मंत्रालय
4. मुख्तार अब्बास नकवी : अल्पसंख्याक मंत्रालय
5. सुरेश प्रभू : वाणिज्य मंत्रालय
6. स्मृती इराणी : माहिती आणि प्रसारण मंत्रालय
7. नितीन गडकरी : रस्ते वाहतूकसह गंगा स्वच्छता अभियानचा अतिरिक्त भार
8. उमा भारती : पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

राज्यमंत्री
1. शिवप्रताप शुक्ला : वित्त राज्यमंत्री
2. अश्विनीकुमार चौबे : आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
3. वीरेंद्र कुमार : महिला आणि बालविकास राज्यमंत्री
4. अनंतकुमार हेगडे : कौशल्य विकास राज्यमंत्री
5. राजकुमार सिंह : ऊर्जा मंत्रालय (स्वतंत्र पदभार)
6. हरदीपसिंह पुरी : नगरविकास राज्यमंत्री
7. गजेंद्रसिंह शेखावत : कृषी राज्यमंत्री
8. सत्यपाल सिंह : शिक्षण राज्यमंत्री
9. अल्फोंस कन्ननथनम : पर्यटन मंत्रालय (स्वतंत्र पदभार)

‘जेडीयू‘वर लालूंची, मोदींवर शिवसेनेची कडवट टीका!
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तील एकाही घटकपक्षाला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपला फक्त विधेयक मंजूर करताना आणि निवडणुका जवळ आल्यावरच एनडीएची आठवण होते. एनडीए मेली असून फक्त कागदावर उरली आहे, अशी जळजळीत टीका शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहांवर केली. राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्याकडे शिवसेनेच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली होती. दुसरीकडे, नीतीशकुमारसारख्या पलटूरामवर मोदींचा विश्वास नाही. या पलटूरामला मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाचे नुसते गाजर दाखविले गेले होते, अशी टीका राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी करून नीतीशकुमार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य संख्या 81 एवढी करता येऊ शकते. मंत्रिमंडळ विस्तारात चौघांना बढती देण्यात आली. नऊ नवे मंत्री बनविण्यात आले तर सहा जणांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे एकूण मंत्रिमंडळाची संख्या 76 झाली आहे. अद्याप पाच जागा रिक्त असल्याने पुढील विस्तारात शिवसेना व जेडीयूला संधी मिळू शकते, असे भाजपच्या दिल्लीस्थित वरिष्ठांनी सांगितले.