आज केंद्रीय मंत्रिमंडळात बदल
केंद्र सरकार मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता असून, रविवारी सकाळी 10 वाजता हे बदल होण्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. याचदरम्यान निवडणूक आयुक्त महालेखा नियंत्रक, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि इतर प्रशासकीय सेवेतील 17 अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक समोर ठेवून त्या दृष्टीने मंत्रिमंडळ व प्रशासनात हवे तसे बदल करण्याची सुरुवात केल्याचे दिसत आहे.
रविवार मंत्रिमंडळातील बदल जाहीर होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौर्यावर जाणार आहेत. ते परत मायदेशात परतताच मंत्रिमंडळात आवश्यक ते बदल होणार आहेत. रेल्वे मंत्रालय व रस्ते वाहतूक मंत्रालय असे एकत्र मिळून नव्या संयुक्त मंत्रालयाची स्थापना केली जाणार आहे. रेल्वे विभाग व रस्ते वाहतूक विभागाच्या कामकाजातील सावळागोंधळ पाहता या विभागांचे एकत्रित मंत्रालय केल्यास नव्या गोंधळाची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वे मंत्रिपदाचा कारभार देण्याची शक्यता आहे तसेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पर्यावरण, गंगा शुद्धीकरण व वस्त्रोद्योग मंत्रिपद देण्याची जास्त शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळाच्या हालचालींना वेग आला आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीवप्रताप रुडी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची घटना घडली. हा राजीनामा रुडी यांना पक्ष नेतृत्वाकडून विशेष संदेश दिल्याचे निदर्शक वाटतो.
बिहार राज्यात नरेंद्र मोदी यांनी राजकीय भूकंप घडवून आणत विरोधक नितीशकुमार यादव व संयुक्त जनता दलाचे अनेक नेते, कार्यकर्ते यांच्याशी संधान बांधत बिहारमध्ये विधानसभेवर सत्तेचा झेंडा फडकवला. यापूर्वी नितीशकुमार यादव हे लालू प्रसाद यादव यांच्यासमवेत बिहारमध्ये सत्तेवर होते. परंतु, नितीशकुमार यादव व लालूप्रसाद यांची युती भाजपने मोठ्या कौशल्याने तोडली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर मिशन 350 हे अभियान राबवण्यास केव्हाच सुरुवात केली आहे. पूर्व आराखडा, पूर्ण आराखडा हे भाजप नेतृत्वाचे ब्रीद वाक्य बनले आहे. पूर्व संकल्प, पूर्ण संकल्प हेही या मिशनचे ब्रीद आहे. एखादे कार्य साध्य करण्यासाठी सर्वात प्रथम संकल्प व आराखडा योग्य पद्धतीने तयार केला पाहिजे तरच कार्य यशस्वी होऊ शकेल या तत्त्वावर भाजप पक्षाची भवितव्यातील रणनीती चालणार आहे. मिशन 350 म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकीत काहीही करून, (त्यात राजकारणाचे सर्व प्रकार आले) लोकसभा निवडणुकीत 350च्या वर खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे. भाजपने त्यासाठी आता देशात सर्वत्र पावले टाकायला सुरुवात केली आहे. मंत्रिपदापासून दूर केलेल्या नेत्यांवर आगामी निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. एकूण या मंत्रिमंडळाच्या रचनेत कोणी नाराज होणार नाही, याची दक्षता भाजप नेतृत्वाकडून घेतली जाणार आहे. मंत्रिमंडळातील फेररचना हा भाजपच्या मिशन 350चा एक महत्त्वाचा भाग असल्याचे दिसून येत आहे. रविवारी हे मंत्रिपदाचे बदल जाहीर होतील. पंतप्रधान चीनच्या दौर्यावरून परत येताच मंत्रिमंडळ विस्तार होईल. याद्वारे भाजपचे मिशन 350 आता कार्यरत झाले आहे. विरोधकांनी आता पुढील निवडणुकीसाठी तयारीला लागण्याची आवश्यकता वाटते; नाहीतर 2014 सारखी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांची गत होईल. एवढेच तूर्त तरी म्हणता येईल.
-अशोक सुतार
साहित्यिक, व्यंगचित्रकार
8600316798