केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डॉ. प्रथमेश सोटुरचे यश

0

पिंपरी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीडीएस (कम्बाईन डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत निगडी येथील डॉ. प्रथमेश मोहन सोर्टुर यांनी भारतात 21 व्या क्रमांकाने (रँक) उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यामुळे त्यांना भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. एप्रिलपासून चेन्नई येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण सुरु होत आहे.
डॉ. प्रथमेश गेली पाच वर्षे नाशिक येथील आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होते. बी.ए.एम.एस. उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास केला. लहानपणी आईच्या संस्कारामुळे डॉक्टर झालो तरी देशसेवा करण्याची उर्मी गप्प बसून देत नव्हती. त्यामुळे बी.ए.एम.एस. ची परीक्षा झाल्यानंतर केवळ दिड दोन महिन्यात दिवसाला पंधरा सोळा तास अभ्यास करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाची (सीडीएस) परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाले आहेत.

लहानपणापासूनच होता निर्धार…
या वाटचालीबाबत बोलताना डॉ. प्रथमेश म्हणाले की, आईने माझे भविष्य घडविण्यासाठी मी लहान असतानाच नोकरी सोडली होती. आई लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आदी महापुरुषांसह स्वातंत्र्य संग्रामाच्या गोष्टी सांगत असे. त्याचवेळी काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार केला होता. आज आईचे स्वप्न पूर्ण केल्याच अभिमान वाटतो. तसेच वडीलांनी कायमच माझ्या पाठीशी रहात मला प्रोत्साहान दिले. परीक्षेची तयारी व अभ्यासाविषयी बोलताना प्रथमेश यांनी सांगितले की, वैद्यकीय परीक्षा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी गेली तीन वर्षे व्हॉट्सअँप, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल मिडीयाचा पूर्ण त्याग केला होता. स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सोशल मिडीया पासून तरुणांनी दूर राहिले पाहिजे, अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे व चालू घडामोडीचे आकलन वेळोवेळी ठेवले पाहिजे असाही सल्ला त्यांनी दिला.